
स्थैर्य, फलटण, दि. १६ नोव्हेंबर : फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून, प्रभाग क्रमांक १२ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या (खासदार गट) उमेदवार सौ. सुनंदा सुधीर शहा यांचा प्रचार जोरदार सुरू आहे. त्यांचे सुपुत्र आणि प्रसिद्ध युवा उद्योजक सागर (शेठ) शहा यांनी प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली असून, त्यांच्या घरोघरी संपर्काला मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. प्रभागातील वातावरण पूर्णपणे भाजपमय झाल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
प्रभाग क्रमांक १२ मधील दत्तनगर, हणमंतराव पवार हायस्कूल परिसर, सफाई कामगार कॉलनी आणि महात्मा फुले चौक या प्रमुख भागात प्रचारादरम्यान सागर शहा यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला. यावेळी घरोघरी जाऊन मतदारांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांच्या निराकरणाची ग्वाही दिली. जेष्ठ नागरिकांचे आशीर्वाद आणि महिला वर्गाचा मिळणारा उत्स्फूर्त पाठिंबा यामुळे सौ. सुनंदा शहा यांचे पारडे जड मानले जात आहे.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील आणि फलटण नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आपण निवडणूक लढवत असल्याचे सौ. सुनंदा शहा यांनी स्पष्ट केले आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना तळागळात पोहोचवण्यासाठी आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे आश्वासन त्यांनी मतदारांना दिले आहे.
प्रचारादरम्यान बोलताना सागर शहा म्हणाले की, “आम्ही केवळ निवडणुकीपुरते लोकांमध्ये येणारे नाही, तर सुख-दुःखात नागरिकांच्या सोबत उभे राहणारे आहोत. यापूर्वीही प्रभागात आम्ही अनेक विकासकामे मंजूर करून ती यशस्वीरीत्या पूर्णत्वास नेली आहेत. भविष्यातही विकासाच्या कामात कुठेही कमी पडणार नाही, हा आमचा शब्द आहे.” सामान्य नागरिकांच्या एका हाकेला धावून जाणारे कार्यकर्ते अशी शहा कुटुंबाची ओळख असल्याने मतदारांमध्ये विश्वासाचे वातावरण आहे.
सागर (शेठ) शहा हे स्वतः एक यशस्वी युवा उद्योजक आहेत. बांधकाम व्यवसायात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला असून, फलटणमधील तरुणाईसाठी पहिली सुसज्ज अशी जिम उभारून त्यांनी आरोग्यविषयक जागृती निर्माण केली आहे. त्यांच्या या कार्यपद्धतीमुळे तरुण वर्गाची मोठी फळी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे. तरुणांचा हा मोठा पाठिंबा सौ. सुनंदा शहा यांच्या विजयात निर्णायक ठरेल, असे बोलले जात आहे.
प्रभागातील विकासकामांचा आढावा घेताना मतदारांनीही विद्यमान परिस्थितीवर समाधान व्यक्त करत पुन्हा एकदा कार्यक्षम नेतृत्वाला संधी देण्याचा निर्धार केला आहे. विशेषतः सफाई कामगार कॉलनी आणि दत्तनगर परिसरातील नागरिकांनी सौ. सुनंदा शहा यांच्यावर मोठा विश्वास दाखवला आहे. ‘विकास हवा असेल तर कमळच हवे’, अशी भावना मतदारांमधून व्यक्त होत आहे.
निवडणुकीच्या या अंतिम टप्प्यात सौ. सुनंदा शहा यांच्या प्रचाराने वेग घेतला असून, प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या तुलनेत त्या आघाडीवर असल्याचे चित्र आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक आणि सर्वसामान्य जनता अशा सर्वच स्तरांतून मिळणारा पाठिंबा पाहता, प्रभाग क्रमांक १२ मध्ये भाजपचा विजय निश्चित मानला जात आहे. मतदारांनी आपला अमूल्य कौल देऊन सौ. सुनंदा शहा यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहन सागर शहा यांनी केले आहे.
शेवटी, “आमचा अजेंडा फक्त विकास आहे आणि आमची बांधिलकी जनतेशी आहे,” या शब्दांत सौ. सुनंदा शहा यांनी आपला विजयाचा विश्वास व्यक्त केला. प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांच्या प्रचार फेऱ्यांमध्ये सहभाग नोंदवला, हेच त्यांच्या वाढत्या लोकप्रियतेचे द्योतक आहे.

