
स्थैर्य, 17 फेब्रुवारी, सातारा : राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 या कालावधीतील मुदत संपणार्या व नव्याने स्थापित ग्रामपंचायतीसाठी नव्याने प्रभागरचना करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. प्रारुप प्रभाग रचना तयार करण्यासाठी राज्य शासनाकडून खालीलप्रमाणे कार्यक्रम जाहीर झाला आहे.
प्रारुप प्रभागरचना तयार करण्यासाठी तहसिलदार यांनी गुगलअर्थ चे नकाशे सूपर इंपोज करुन प्रत्येक गावाचे नकाशे अतिंम करण्याची मुदत 20 फेब्रुवारी 2026 पर्यंत आहे. तसेच संबधित तलाठी व ग्रामसेवक यांनी संयुक्त स्थळ पाहणी करुन प्रभाग पाडणे, सीमा निश्चित करणे 27 फेब्रुवारी 2026 पर्यंत. तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली समितीने प्रारुप प्रभागरचनेची तपासणी करण्याची मुदत 5 मार्च 2026 पर्यंत., यामध्ये गट विकास अधिकारी व सबंधित मंडळ अधिकारी यांचा समावेश असेल. समितीने प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेसाठी सादर करण्याची मुदत दिनांक 11 मार्च 2026 पर्यंत. जिल्हाधिकारी यांनी नमुना ब ची संक्षिप्त तपासणी करणे व त्यात अवश्यक असल्यास दुरुस्त्या करुन सदर प्रारुप राज्य निवडणुक आयोग किंवा त्यांनी प्राधिकृत केलेला सक्षम अधिकारी यांच्याकडे मान्यतेसाठी सादर करण्याचा दिनांक 17 मार्च 2026 पर्यंत. राज्य निवडणूक आयोग किंवा प्राधिकृत केलेला सक्षम अधिकारी यांनी आवश्यक असल्यास प्रस्तावात दुरुस्ती करुन त्यास मान्यता देण्याची मुदत 23 मार्च 2026 पर्यंत., या दुरस्त्या अंतर्भूत करुन प्रारुप प्रभाग रचना तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने 30 मार्च 2026 पर्यंत मान्यता द्यावी व समितीच्या सर्व सदस्यांनी स्वाक्षरी करावी.
प्रारुप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना मागविण्यासाठी पुढील प्रमाणे कार्यक्रम जाहीर केला आहे. प्रारुप प्रभाग रचनेला (नमुना ब) व्यापक प्रसिध्दी देऊन तहसिलदार यांनी हरकती व सूचना मागवण्यासाठी जाहीर सूचना प्रसिध्द करण्याचा दिनांक 7 एप्रिल 2026 आहे., प्रारुप प्रभागरचेनवर हरकती मागवण्याचा अतिंम दिनांक 13 एप्रिल 2026 हा आहे., प्राप्त हरकती व सूचना सुनावणीसाठी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर करण्याचा दिनांक 16 एप्रिल 2026., प्राप्त झालेल्या हरकतींवर व सुचनांवर सुनावणी घेण्यासाठी अंतिम तारीख 21 एप्रिल 2026., आलेल्या हरकती व सुचनांवर सुनावणीनंतर अभिप्राय नोंदवुन अंतिम निर्णयासाठी प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्याची अतिंम मुदत दिनांक 23 एप्रिल 2026 आहे.
उपविभागीय अधिकारी यांच्याकडुन प्राप्त झालेले प्रस्ताव तपासून जिल्हाधिकारी यांनी प्रभाग रचना अंतिम करुन राज्य निवडणुक आयोगास सादर करण्याचा अंतिम दिनांक 28 एप्रिल 2026 आहे. राज्य निवडणुक आयोगाने मान्यता दिलेल्या अंतिम प्रभाग रचनेला जिल्हाधिकारी यांनी व्यापक प्रसिध्दी देणे 4 मे 2026 पर्यंत अतिंम मुदत आहे.
