प्रभाग ११ मध्ये भाजपचा जल्लोष; प्रियदर्शनी भोसले आणि संदीप चोरमले यांनी मानले मतदारांचे आभार


घरोघरी जाऊन पेढे वाटप; मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त.

स्थैर्य, फलटण, दि. २८ डिसेंबर : फलटण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. या विजयानंतर प्रभाग क्रमांक ११ मधील भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक सौ. प्रियदर्शनी रणजितसिंह भोसले आणि श्री. संदीप चोरमले यांनी प्रभागात घरोघरी जाऊन मतदारांचे आभार मानले. यावेळी पेढे वाटून आणि मतदारांच्या भेटीगाठी घेऊन विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीने फलटण पालिकेवर वर्चस्व सिद्ध केले आहे. प्रभाग क्रमांक ११ मध्ये मतदारांनी महायुतीवर मोठा विश्वास दाखवला. या प्रभागातून नगराध्यक्ष समशेरबहाद्दर नाईक निंबाळकर, नगरसेवक सौ. प्रियदर्शनी भोसले आणि संदीप चोरमले यांना भरघोस मतांनी विजयी केले.

विजयानंतर लगेचच या नवनिर्वाचित सदस्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह प्रभागाचा दौरा केला. “मतदारांनी आमच्यावर जो विश्वास टाकला आहे, त्याबद्दल आम्ही ऋणी आहोत. प्रभागाचा विकास आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू,” अशी भावना यावेळी उमेदवारांनी व्यक्त केली. नागरिकांनीही या विजयी उमेदवारांचे स्वागत केले.


Back to top button
Don`t copy text!