
दैनिक स्थैर्य । दि. २९ जून २०२२ । खंडाळा । पंढरीच्या विठोबाच्या भेटीसाठी निघालेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील हजारो वारकऱ्यांसह पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे पाटील यांच्यासह पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पाडेगाव (ता. खंडाळा) येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हजरत पीर सय्यद पठाणशाह बाबा दर्गाहचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
यावेळी दर्गाह कमिटीने वारकऱ्यांच्या निवाऱ्याची सोय केली तसेच त्यांना खाऊ वाटप ही केले. पाडेगाव (ता. खंडाळा) येथील हजरत पठाणशाह बाबा दर्गाह ही हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून मानली जाते. या दर्गाहच्या वतीने पालखीतील वारकऱ्यांसाठी निवाऱ्याची सोय करण्यात आली होती. तसेच वारकऱ्यांना यावेळी खाऊ वाटपही करण्यात आले. यावेळी पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे पाटील, साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, वाईचे आमदार मकरंद पाटील, फलटणचे आमदार दिपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांनी पठाणशाह बाबांचे दर्शन घेतले. यावेळी मान्यवरांचा दर्गाह ट्रस्टच्यावतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी हजरत पठाणशाह बाबा दर्गाहचे अध्यक्ष मुस्तफा आतार, उपाध्यक्ष रशीदभाई सय्यद, सचिव फिरोज सय्यद , विश्वस्त मोहम्मद गौस आतार यांच्यासह दर्गाह खिदमदगार कमिटीचे सिकंदर शेख, मन्सूर सय्यद, नदीम सय्यद, रियाज पठाण, शाहनवाज शेख, मुबारक आतार आदी उपस्थित होते.