दैनिक स्थैर्य । दि. १३ जून २०२२ । वाई । शहरातील कृष्णा नदीवरील नव्याने होत असलेल्या कृष्णा पुलाचे काम पूर्ण होत आल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सोनगिरवाडी कृष्णापुल ते किसनवीर चौक व शिवाजी चौकातील पाईपलाईन स्थलांतर करण्याचे काम पालिका प्रशासनाने युद्धपातळीवर आज रात्री पर्यंत पूर्ण केले.यामुळे सोमवारी शहराला पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.
शहरात नव्याने होणाऱ्या कृष्णा पुलाच्या कामा मुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप लाईन नदीपात्रातून पुलावर स्थलांतरित करण्याचे काम आज दिवसभर सुरु होते.पालिका प्रशासक तथा मुख्याधिकारी किरणकुमार मोरे,पाणी पुरवठा प्रमुख चंद्रकांत गुजर,स्थापत्य अभियंता सचिन धेंडे,प्रकल्प व्यवस्थापक गणेश धायगुडे,मुकादम रोहित गाढवे आदींनी दिवसभर या परिसरात तळ ठोकून होते.कृष्णा फुलाचे काम बऱ्यापैकी पूर्ण होत आल्याने व पावसाळा सुरू होण्यापूर्वी नदीपात्रातील पाईप लाईन कृष्णा पुलावरून स्थलांतर करणे गरजेचे असल्याने शहरातील पाणीपुरवठा आज दिवसभर खंडित करून काम सुरू होते. कृष्णा पुलावरील साखेवाडी कृष्णापुल ते किसनवीर चौक आणि शहरातील प्रशासकीय इमारतीसमोर शिवाजी चौकात नव्याने होत असलेल्या व्हेजिटेबल अँड फ्रुट मार्केटच्या कामामुळे शिवाजी चौकातील पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप लाईन फिरवून नव्याने जोडणी करण्यात आली. आज दिवसभर पालिका प्रशासन युद्धपातळीवर रात्री पर्यंत हे काम पूर्ण करणार आहे. पाणीपुरवठ्याच्या पाईप स्थलांतरीत करावयाचा असल्याने रविवारी शहरातील पाणीपुरवठा खंडित करण्यात आला होता. सोमवार सकाळपासून पाणी पुरवठा पूर्ववत करण्यात येणार आहे अशी माहिती पालिका प्रशासन व मुख्याधिकारी किरण कुमार मोरे यांनी दिली.