
स्थैर्य, फलटण, दि. २० सप्टेंबर : फलटण शहराच्या आरोग्य उत्सवाची ओळख बनलेल्या ‘आपली फलटण मॅरेथॉन’ साठी नाव नोंदणी करण्याचा आज, शनिवार, दि. २० सप्टेंबर हा शेवटचा दिवस आहे. जोशी हॉस्पिटल प्रा. लि. यांच्या वतीने आयोजित या मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी आजच आपली नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. ही मॅरेथॉन रविवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी ‘अवयवदान प्रोत्साहन’ या संकल्पनेवर आधारित असणार आहे.
यावर्षी मॅरेथॉनमध्ये २१ किमी, १० किमी आणि ५ किमीच्या मुख्य स्पर्धांसह अनेक नवीन प्रकारांचा समावेश आहे. विशेषतः, रोबोटिक सांधेरोपण शस्त्रक्रिया झालेल्या १००० हून अधिक रुग्णांसाठी आणि ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ३ किमीची विशेष ‘वॉकेथॉन’ आयोजित केली जाणार आहे. लहान मुला-मुलींसाठी ३ किमी ‘फन रन’ देखील असणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी वॉकेथॉनमधील प्रवेश विनामूल्य आहे.
मुख्य स्पर्धेतील प्रत्येक वयोगटातील पुरुष आणि महिला विजेत्यांसाठी स्वतंत्रपणे आकर्षक रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. यामध्ये प्रथम क्रमांकास १०,००० रुपये, द्वितीय क्रमांकास ७,००० रुपये आणि तृतीय क्रमांकास ५,००० रुपयांचे बक्षीस दिले जाईल. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक टी-शर्ट, मेडल आणि ई-प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
नाव नोंदणीसाठी पुरुषांकरिता ७५० रुपये, महिलांसाठी ५०० रुपये आणि १२ ते १८ वयोगटातील मुला-मुलींसाठी ३०० रुपये शुल्क आहे. इच्छुकांनी आजच आपली नोंदणी करून या आरोग्यदायी उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक डॉ. प्रसाद जोशी यांनी केले आहे.