सुमारे तीन वर्षांपासून गजानन चौक महात्मा गांधीजींच्या पुतळ्याच्या प्रतिक्षेत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. 02 ऑक्टोबर 2021 । फलटण । प्रसन्न रुद्रभटे आज 2 ऑक्टोबर, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती. देशाला ब्रिटीश राजवटीतून मुक्त करण्यासाठी असंख्य क्रांतिकारकांनी आपले योगदान दिले. त्यामध्ये अग्रणी असलेल्या महात्मा गांधी यांचे कार्य संपूर्ण भारत देशाला अभिमानास्पद असेच आहे. मात्र; देशासाठी केलेल्या महान कार्याबद्दल ज्या महात्मा गांधीजींना ‘राष्ट्रपिता’ ही उपाधी मिळाली त्या महापुरुषाची अवहेलना फलटण नगरपरिषदेकडून सुमारे गेल्या तीन वर्षांपासून सुरु आहे. दुरुस्ती व नूतनीकरणाच्या कारणास्तव शहरातील प्रसिद्ध गजानन चौक येथील महात्मा गांधीजींचा पुतळा काढून जवळपास तीन वर्षे उलटली आहेत. तथापि, आजही हा चौक या पुतळ्याच्या प्रतिक्षेतच आहे.

भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाला ऐतिहासिक महत्त्व आहे. क्रांतिकारकांनी हा लढा दिला नसता तर कदाचित आजही देशाला पारतंत्र्यच भोगावे लागले असते. त्यामुळे ज्या महापुरुषांच्या परिश्रमांमुळे देश स्वतंत्र झाला; त्यांचा सन्मान राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्यच आहे. त्यातल्यात्यात प्रशासकीय यंत्रणेकडून तर अशा महापुरुषांच्या संबंधीत कोणत्याही कामाबाबत दिरंगाई होणे अजिबात अपेक्षित नाही. मात्र; फलटण नगरपरिषदेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेकडून महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे नूतनीकरण व परिसराच्या सुशोभीकरणाच्या कामासाठी सुरु असलेला विलंब शहरवासियांसाठी संतापाची बाब बनलेला आहे.

फलटण शहरातील गजानन चौक हा नेहमीच गजबजलेला परिसर असतो. या ठिकाणचा महात्मा गांधीजी यांचा पुर्णाकृती पुतळा या चौकाची विशेष ओळख आहे. नूतनीकरणासाठी पालिकेकडून सदरचा पुतळा काढण्यात आला. पालिकेच्या पुढाकारातून पुतळ्याचे नूतनीकरण होत असल्याने सुरुवातीला फलटणकरांनी याचे कौतुकच केले. पण पुतळा काढून तब्बल तीन वर्षे उलटूनही नवीन पुतळा या ठिकाणी अद्याप बसवण्यात न आल्याने फलटणकरांमधून पालिकेविरोधात नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे.

महापुरुषांची स्मारके, पुतळे हे त्यांच्या कार्याचे स्मरण व प्रेरणा देत असतात. त्यामुळे अशा सार्वजनिक ठिकाणांची योग्य निगा राखणे, पावित्र्य जपणे ही स्थानिक प्रशासनाची जबाबदारी असते. मात्र फलटण पालिकेकडून शहरात असलेल्या विविध महापुरुषांच्या पुतळ्यांकडे नेहमीच दुर्लक्ष होत आले आहे. यंदाचे 2021 हे वर्ष भारतीय स्वातंत्र्य दिनाचे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरे होत आहे. त्यामुळे निदान या वर्षाचे महत्त्व लक्षात घेवून तरी फलटण पालिकेने महात्मा गांधीजींचा पुतळा पुन्हा बसवावा आणि त्यांची अवहेलना थांबवावी, अशी अपेक्षा फलटणकर नागरिक व्यक्त करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!