
स्थैर्य, कराड, दि. 20 : कराड शहरात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णांना तत्परतेने सेवा देताना प्रशासनावर ताण येत आहे. त्यामुळे अनेक पॉझिटिव्ह रुग्ण अक्षरश: उपचार मिळण्याची वाट पहात आहेत. त्यामुळे प्रशासनाने समान यंत्रणा उभारणे गरजेचे आहे. यासाठी शहरातील सामाजिक संस्थांना आवाहन करून त्यांना यामध्ये सहभागी केले तर प्रशासनावर ताण कमी होईल, असे मत व्यक्त होत आहे.
कराडमध्ये सध्या पाच कोविड सेंटर आहेत. पैकी चार कोविड हॉस्पिटल असून एक विलगीकरण कक्ष आहे. परंतु शहरासह तालुक्यातील संख्या दररोज झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे बेडची संख्या कमी पडत आहे. 150 च्या वर रुग्ण होम आयसोलेशन आहेत. दररोज पॉॅझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. प्रत्येक रुग्णांपर्यंत पोहोचणे आरोग्य कर्मचार्यांना शक्य होत नसल्याने परिस्थिती गंभीर होत आहे. आरोग्य केंद्राकडे स्टाफ कमी आहे. त्यामुळे रुग्णांपर्यंत पोहोचणे अवघड होत आहे. नगरपालिकेचे कर्मचारी रुग्णांची ने-आण करणे, मृत बॉडी स्मशानभूमीत नेणे, अंत्यसंस्कार करणे आदी कामात आहेत तर उर्वरित कर्मचारी साफसफाई, फवारणी करत आहेत. यामुळे सर्वत्र कर्मचार्यांची पळापळ होत आहे. यासाठी सामाजिक संस्था, कार्यकर्ते, युवक इच्छुक आहेत. प्रत्येक संस्थेला, कार्यकर्त्यांना पेठवाईज कामे विभागून देण्यात यावीत. जेणेकरून रुग्णांना प्राथमिक स्तरावर मदत मिळू शकेल.
नगरपालिकेचे काही कर्मचारी सध्या गणेश विसर्जनाची कामे करत आहेत. गणेश मूर्ती संकलनासाठी शहरातील प्रत्येक पेठेमध्ये फिरते वाहन ठेवण्यात आले आहे तसेच जलकुंभ उभारण्यात आले आहेत. स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी कर्मचार्यांची एक टीम कार्यरत आहे तर साफसफाई, औषध फवारणी, कंटेन्मेंट झोन तयार करणे याशिवाय नगरपालिकेतील दैनंदिन कामकाज यासाठी कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे सर्वत्र धावपळ करताना कर्मचारी अपुरे पडत आहेत.