
दैनिक स्थैर्य | दि. २९ ऑक्टोबर २०२१ | वाई | वाई तालुका सहकारी सूत गिरणीच्या कर्मचाऱ्यांना यावर्षी दिवाळीनिमित्त बोनस जाहीर करण्यात आल्याची माहिती सूतगिरणीचे अध्यक्ष शशिकांत पिसाळ यांनी दिली.
सूतगिरणीच्या स्थापनेपासून सूत गिरणी वेगवेगळ्या अडचणीतून मार्गक्रमण करीत होती. कापसाच्या दरातील व सुताच्या दरातील चढ-उतार, उत्पादनातील अडचणी यामुळे सूतगिरणीला मोठ्या प्रमाणात तोटा झाल्याने सूतगिरणीचे उत्पादन बंद होते. परंतु संचालक मंडळाच्या अथक प्रयत्नाने मागील सहा महिन्यांपासून सूतगिरणीचे उत्पादन पूर्ववत नियमित सुरू झाले आहे. सूतगिरणीचे उत्पादन नियमित सुरू झाल्याने व चांगल्या पद्धतीने चालवल्यामुळे कर्मचार्यांचे अडचणीच्या काळातील मोठे योगदान लक्षात घेऊन संचालक मंडळाने कर्मचाऱ्यांसाठी ८.३३ टक्के प्रमाणे दिवाळी बोनस देण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला आहे. यामुळे अडचणीच्या काळात संस्थेला सहकार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष शशिकांत पिसाळ उपाध्यक्ष नारायण जाधव यांनी दिली. यावेळी संचालक नितीन पाटील, प्रमोद शिंदे,सुरेश बाबर,धर्माजी शिर्के,कार्यकारी संचालक रमेश कदम व सर्व संचालक उपस्थित होते.