
दैनिक स्थैर्य । दि. २७ सप्टेंबर २०२१ । वाई । आर्थिक फसवणूकप्रकरणी रामानंद मल्टिस्टेट को. ऑप क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह नऊ जणांवर गुन्हे दाखल करण्याचे वाई न्यायालयाने आदेश दिले. येथील सिद्धनाथवाडीतील सचिन लक्ष्मण पोळ या माजी सैनिकाने जानेवारी 2020 मध्ये रामानंद मल्टिस्टेट को. ऑप क्रेडिट सोसायटीच्या वाई शाखेत 8 लाख 50 हजारांची रुपयांची ठेव अल्प मुदतीसाठी ठेवली होती. या ठेव पावतीची मुदत संपल्यावर ते रक्कम आणण्यासाठी संस्थेत गेले असता, त्यांना पैसे देण्यास टाळाटाळ केली.
याबाबत वाई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी कोविडचे कारण सांगून तक्रार घेतली नाही. सोसायटीचे अध्यक्ष विश्वास शिंदे, उपाध्यक्ष भावेश मांडलिक व व्यवस्थापक मंगेश पिसाळ यांच्यासह नऊ जणांनी आकर्षक बक्षिसाचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात ठेवी स्वीकारल्या आहेत. मात्र, मुदत संपल्यानंतर ठेवीची रक्कम परत देण्यास टाळाटाळ करीत होते. वाई शाखा बंद असल्याचे निदर्शनास आल्याने फिर्यादी पोळ यांनी ठाणे येथील सोसायटीच्या मुख्य कार्यालयात जाऊन पैशाची मागणी केली.
तेव्हा संस्थेच्या पदाधिकार्यांनी संगनमत करून फसवणूक केल्याचे त्यांच्या लक्षात आले. अनेक वेळा पाठपुरावा करूनही पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयात अॅड. विकास पाटील-शिरगावकर यांनी पोळ यांची बाजू मांडली. त्यावर न्यायालयाने नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश वाई पोलिसांना दिले आहेत.