जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मतदान यंत्रणा सज्ज

जिल्ह्यातील 65 गट आणि 130 गणांसाठी शनिवारी होणार मतदान


स्थैर्य, 5 फेब्रुवारी, सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या 65 गट आणि 11 पंचायत समितीच्या 130 गणासाठी शनिवारी दिनांक 7 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या कालावधीमध्ये मतदान होत आहे. या मतदानासाठी जिल्ह्यात 11 हजार 822 मतदान यंत्र तैनात करण्यात आले आहेत. सातारचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील 21 लाख 94 हजार 110 मतदार मतदान करणार आहेत. यासाठी वीस हजार कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सातारा जिल्ह्यातील जावळी, पाटण, महाबळेश्वर, वाई, कराड येथील काही अति दुर्गम व मागास भागातही मतदान यंत्रणा पोहोचवण्यासाठी हालचाली सुरू आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये आठ वर्षानंतर होणार्‍या सातारा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात

सत्ताधार्‍यांतर्गतच तसेच विरोधी पक्षातील उमेदवारांची कसोटी लागणार आहे. बर्‍याच अपेक्षांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. स्थानिक जिरवा जिरवीच्या राजकारणामुळे काही अपक्षांनी आपले उमेदवारी अर्ज ठेवून या निवडणुकीत आपलं अस्तित्व दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. सातारा जिल्ह्यात अकरा लाख 8 हजार 203 पुरुष व दहा लाख 85 हजार847महिला आणि इतर 60 मतदार नोंदणी झालेली आहे. जिल्ह्यातील 2,877 मतदान केंद्रावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस व खासगी वाहनाने मतदान यंत्रणा व कर्मचार्‍यांना जाण्या येण्यासाठी सोय केली आहे. तर दुसर्‍या बाजूला परगावातील मतदारांसाठी आर्थिक दृष्ट्या सक्षम उमेदवारांनी वाहनांचे नियोजन केले आहे. खर्‍या अर्थाने राजकीय पक्ष व उमेदवारांनी आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीच्याबाबत शासकीय काही अधिकारी व कर्मचार्‍यांच्या डोळ्यात अंजन घातले आहे. प्रस्थापित उमेदवारांच्या प्रचारा निमित्त ग्रामीण भागात जेवणावळी सुरू आहे. अद्यापही एकाही ठिकाणी कारवाई झालेली नाही.

निवडणुका म्हणजे खर्‍या अर्थाने लोकशाहीचा उत्साह पूर्वी होता. आता सत्ताधार्‍यांच्या समवेतच काही प्रशासकीय पक्षनिष्ठा व व्यक्तीनिष्ठांचा उद्रेक झालेला आहे. अनेक ठिकाणी विनापरवाना प्रचाराची वाहने हिंडत आहेत. सत्ताधार्‍यांच्या सोबतच अनधिकृत व्यावसायिक प्रचारामध्ये उतरले आहेत. लेखी तक्रारीची गंभीर दखल घेतली नसल्याचा अनुभव आहे. याची सुद्धा उघडपणे चर्चा ग्रामीण भागात होताना दिसत आहे आहे.

 जिल्ह्यातील तालुकानिहाय मतदान यंत्रणा

सातारा – 371, कराड – 486, पाटण – 401 कोरेगाव – 253, वाई – 181, खंडाळा -114, महाबळेश्वर – 109 , जावळी- 154, फलटण – 282, माण- 217, आणि खटाव 309 अशी मतदान यंत्रणा आहे. निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना या यंत्रणेची तपासणी करूनच मतदानाला सुरुवात करावी लागणार आहे. तसेच काही ठिकाणी तक्रार असेल तर त्या तक्रारीचे तातडीने जागेवरच निरसन करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.


Back to top button
Don`t copy text!