
स्थैर्य, फलटण, दि. १२ ऑक्टोबर : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, फलटण शहरातील मतदार नोंदणी प्रक्रियेला वेग देण्यासाठी नगरपरिषद शिक्षण मंडळाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. यासाठी शहरातील विविध शाळांचे मुख्याध्यापक व प्राचार्य यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना मतदार नोंदणीचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी दिली.
शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी पी. एन. संकपाळ यांनी १० ऑक्टोबर रोजी काढलेल्या आदेशानुसार, नियुक्त करण्यात आलेल्या नोडल अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील पात्र पदवीधर आणि शिक्षक मतदारांची नोंदणी झाली आहे की नाही, याची तपासणी करायची आहे.
संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदार याद्या प्राप्त करून, सहायक शिक्षकांच्या मदतीने स्वतंत्र अहवाल तयार करून तो तहसील कार्यालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

