दैनिक स्थैर्य । दि. ०९ ऑगस्ट २०२२ । सातारा । इतिहास विभाग, छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा, सातारचे प्रतिसरकार समिती सातारा, महात्मा गांधी स्मारक समिती,सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिवाजी कॉलेजच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दिनांक ८ ऑगस्ट, २०२२ रोजी झालेल्या विशेष व्याख्यान प्रसंगी स्वातंत्र्यसंग्राम आणि देश उभारणीतील युवकासमोरील आव्हाने या विषयावर डॉ. कुमार सप्तर्षी हे बोलत होते. याप्रसंगी ते बोलताना म्हणाले की, भारतातल्या युवा वर्गाला फॅसीझमच्या विरुद्ध बोलावे लागेल. देश वाचवण्यासाठी अजून चार वर्षे शिल्लक आहेत. या देशातल्या युवकांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात फॅसीझमच्या विरोधात लढण्याचा दृढ संकल्प करावा आणि स्वातंत्र्याचे जतन करण्यासाठी आयुष्यातील तीन वर्षे द्यावीत जसा प्रति सरकारने ब्रिटिशांच्या विरुद्ध लढण्याचा सातारा जिल्ह्यामध्ये आदर्श प्रयत्न करून भारताला तो आदर्श दिला होता त्याच जिल्ह्यातून दुसऱ्यांदा प्रतिसरकार याने देशात येऊ घातलेल्या फासीवादाविरुद्ध लढण्याचा संकल्प करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. कुमार सप्तर्षी यांनी केले. विचारमंचावर महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे, अन्वर राजन, महाविद्यालयाच्या उपप्राचार्या रोशनारा शेख, स्वातंत्र्यसेनानी पतंगराव फाळके, गांधी स्मारक समितीचे अध्यक्ष शिवाजी राऊत, असलम तडसरकर, इतिहास विभागाचे प्रमुख डॉ. धनाजी मासाळ, समन्वयक प्रा.मनोहर निकम हे उपस्थित होते.
हा देश सुधारक आणि शेकडो जाती यांच्यामध्ये विभागला गेल्याचे सांगून डॉ. सप्तर्षी म्हणाले की या देशांमध्ये मनुस्मृती हा
उकिरड्यावर टाकून देण्यासारखा विषमतेचे समर्थन करणारा ग्रंथ आहे. हा पाप-पुण्याचे समर्थन करणारा ग्रंथ आहे. आपली जात आपला धर्म हे जैविक अपघात असल्याचे सांगून ते म्हणाले की आजच्या युवकांना मागून आई-वडील निवडण्याचा जर पर्याय दिला तर आजचे युवक २७ मजली घर बांधणाऱ्या अंबानीची निवड पालक म्हणून करतील. या युवकांनी हे समजावून घेण्याचे गरज आहे. की जगात नाही अशी अस्पृश्यता भारतात आहे. इथे पाप-पुण्याच्या, शुभ-अशुभच्या असंख्य कल्पना आहेत, या सगळ्या टाकून देण्याची गरज आहे. ब्राह्मणांचे सोहळे आणि अस्पृश्यांचे ओवळे ही भेदनीती परंपरागत चालत आली आहे. अमानुष अस्पृश्यता आम्ही खेड्यामध्ये पाहिली असल्याचे सांगून सप्तर्षी म्हणाले की या देशात शोषणाची परंपरा अबाधित ठेवण्यासाठी कुलकर्णी, देशमुख, पाटील आणि त्या सुभ्याचा सरदार यांचे संघटित प्रयत्न या देशातील शेतकरी गरीब यांना लुटत आहेत बहुसंख्यांक नावाचे जातीचे भावकीचे राजकारण महाराष्ट्रामध्ये टोकाला गेले आहे. जात ही इथे प्रत्येकाला मेल्यानंतर खांद्यावर नेण्यासाठीच फक्त उपयोगी पडते हे विसरू नये. जातीचा विकासाशी कौशल्यशी काही एक संबंध नाही असे नमूद करून डॉ. सप्तर्षी म्हणाले की इथल्या राजेशाहीच्या राजपुत्र युवकांना खूप लाडात, कोडात वाढवण्याची इथे प्रथा आहे.
डॉ. सप्तर्षी पुढे म्हणाले की १९१५ ला महात्मा गांधी आफ्रिकेतून भारतात आले. त्यांनी आफ्रिकेत लोकांच्यासाठी तेथील
इंडियन लोकांच्यासाठी शिक्षणाचे आश्रमात प्रयोग केले. त्यांनी स्वतः शिक्षक म्हणून मुलांना शिकवले ते शिक्षक बनले ते त्यांचे अनुभव भारतात त्यांना फार उपयुक्त पडले .भारतात प्रत्येक माणसाची समज जातीपर्यंतच आहे. जातीच्या पुढे भारतीय नागरिकांची समज जात नाही. त्यांची समज जातीच्याजवळ संपते तेव्हा येथे देश, समाज याचा प्रश्नच येत नाही ज्या देशात बहुसंख्यांक समाजाचा विचार देव आणि जात इथे संपतो तो समाज प्रगती करू शकत नाही.धर्मांतर करून करून प्रश्न सुटत नाहीत. गांधींनी भारतातील अस्पृश्यता ओळखली होती म्हणूनच त्यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात खालच्या समाजाला सोबत घेतले होते. गांधीजींच्या सोबत स्वातंत्र्य लढ्यात महिला मोठ्या संख्येने होत्या ज्या समाजावर अत्याचार होतो त्या तळागाळातील समाजाला गांधी हे आपले उद्याचे आशा केंद्र वाटत होते.धर्मापेक्षा राजकीय नीतिमत्ता फार महत्त्वाची आहे. भारतात गांधीपूर्वी धार्मिक नीतिमत्तेला खूप महत्त्व देण्यात येत असे मात्र महात्मा गांधींनी स्वातंत्र्यलढ्यात राजकीय नीतिमत्ता ही श्रेष्ठ बनवली. संपूर्ण हे जग महात्मा गांधीजींच्या अहिंसेचा विचार आज स्वीकारत आहे. गांधीजींचा २ ऑक्टोबर हा जन्मदिन जगभर साजरा होतो आहे. जगातील महासत्तांच्याकडे अनेक वेळा पृथ्वी भाजून काढता येईल इतके बॉम्ब आहेत अशावेळी या महासत्तावादी देशांना गांधीजींच्या अहिंसा विचाराचा पुरस्कार करावा लागतो येथील युवकांनी समजावून घेण्याची गरज आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली आहेत. अशा वेळेला आपण वर्तमान आणि भविष्याचा विचार करून देश पुढे नेला पाहिजे, पाठीमागे काय घडले, काय केले हे सतत काढून हा देश प्रगतीपथावर जाणार नाही असे नमूद करून डॉक्टर म्हणाले की आपण सहिश्णु असूनही असहिष्णू करण्याचे, भडकवण्याचे काम सध्या चालू आहे. हे, राजकारण युवकांनी ओळखले पाहिजे हा देश पाश्चात्य लोकांच्या आक्रमणानंतर बदलेला देश आहे. भारतामध्ये उतरंडी जाती व्यवस्था आहे. रांजण ते गाडगे या चातूर्वणाने व्यवस्थेचे वरचे छोट्या तोंडाचे घाडगे सतत बोलते ठेवले आहे आणि भार सोसणारे तळाचा रांजण हे तोंड शतकानुशतके गप्प ठेवून ते राहिले आहे अशीच समाजाची वर्णव्यवस्थेची अवस्था आहे हे युवकांनीसमजावून घेण्याची गरज आहे.माणसाशी माणसाला जोडतो तो धर्म आणि माणसांशी माणसाला तोडतो तो अधर्म भारताच्या या भूमीवर असंख्य जनजाती जीवन जगत आहेत त्यांच्या सर्वांच्या मुखातील एक स्वातंत्र्याचा आवाज हा बुलंद केला पाहिजे टिकवला पाहिजे. स्वातंत्र्य हे नष्ट करण्याचे फासीवादाचे प्रयत्न या देशात सुरू झाले आहेत हे सांगून डॉक्टर म्हणाले की स्वातंत्र्यानंतर इथे निर्माण होऊ लागलेली समानता, स्त्रियांचा विकास, सर्व खालच्या जातींचा विकास हा रोखण्यासाठी फाशीवाद आणला जातो आहे. सन्मानाने जगण्याचा घटनात्मक अधिकाराचा संकोच कायम केला जाईल अशी भविष्य निर्माण झाले आहे म्हणून आजच्या युवकांनी जातीच्या पलीकडे जाऊन, धर्माच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय स्वातंत्र्य कायम टिकवण्यासाठी फासीवादाच्या विरुद्ध आयुष्यातील येथून पुढचे तीन वर्षे निर्भयपणे बोलण्याचे काम करावे. युवकांनी येरवडा विद्यापीठाचे पदवीधर व्हावे, त्यासाठी तयारी ठेवावी असेही आव्हान त्यांनी शेवटी केले. स्वातंत्र्य संग्राम आणि देशउभारणीतील युवकांसमोरील आव्हाने ही फासीवादाच्या विरुद्ध लढणे हीच आहेत असेही शेवटी त्यांनी सांगितले.
आपल्या अल्पशा भाषणात आपले मनोगत व्यक्त करताना आमदार शशिकांत शिंदे म्हणाले की, सातारा जिल्हा हा स्वातंत्र्याच्या चळवळीतील अग्रेसर जिल्हा आहे या जिल्ह्यातूनच पुन्हा जातीवादाविरुद्ध, फासीवादाविरुद्ध लढणारा युवा वर्ग तयार होईल तो होण्याची गरज आहे, गांधी समजून घेण्याची गरज आहे आज हे प्रबोधन ऑगस्ट क्रांतीच्या चळवळीला पुढे नेण्यासाठी उपयुक्त असल्याचे सांगून रयत शिक्षण संस्था हे ऑगस्ट क्रांतीचे प्रबोधन सत्र पुढे नेईल असेही आश्वासन त्यांनी प्रमुख वक्ते कुमार सप्तर्षी यांना यानिमित्ताने दिले. महात्मा गांधी स्मारक समितीचे अध्यक्ष शिवाजी राऊत यांनी छोटेखानी मनोगतात, समतेसाठी लढूया, स्वातंत्र्याच्या संघर्षासाठी लढूया, संविधानाच्या संरक्षणासाठी लढू, भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढू यातूनच फासीवादाच्या विरुद्ध लढण्याची सामर्थ्य मिळेल हेच ऑगस्ट क्रांतीच्या चळवळीचे उद्दिष्ट होते आणि आजही आहे म्हणून हा कार्यक्रम घेतल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा उपप्राचार्या रोशनआरा शेख म्हणाल्या की, रयत शिक्षण संस्थेचे शिवाजी कॉलेज सातारा हे कर्मवीरांच्या सत्यशोधक विचारधारेमुळे स्वातंत्र्याच्या चळवळीशी सुरुवातीपासून जोडले गेलेले आहे. आजच्या युवकांनी धोक्यात आलेल्या स्वातंत्र्य मूल्यांचे संरक्षण करण्यासाठी फासीवादाचे संकट समजावून घेऊन मार्गक्रमण करावे. गांधी समजून घ्यावा तरच देश समजेल असे सांगून त्यांनी अध्यक्षीय समारोप केला.
प्रारंभी महाविद्यालयाचे इतिहास विभागाचे प्रा.मनोहर निकम यांनी प्रास्ताविक केले… इतिहास विभागाचे प्रमुख प्रोफेसर डॉ.
धनाजी मासाळ सर यांच्या हस्ते मान्यवरांचे रयत स्नेहवस्त्र, स्मृतीचिन्ह व ग्रंथ भेट देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार डॉ.विकास येलमार यांनी तर सूत्रसंचालन डॉ.सीमा कदम यांनी केले. प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर यांचे मार्गदर्शनाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.