दैनिक स्थैर्य | दि. २९ ऑगस्ट २०२४ | फलटण |
कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली सासकल (तालुका फलटण, जिल्हा सातारा) येथे सुपर केन नर्सरी तयार करण्यात आली आहे. उसाचे एकरी शंभर टन लक्ष ठेवण्यात आले आहे. सुपर के नर्सरीचे जनक डॉ. बाळकृष्ण जमदागणे यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कृषी विभागामार्फत सासकल येथील शेतकर्यांमध्ये सुपर केन नर्सरीच्या तंत्रज्ञानाबाबत शेतकरी मेळावे प्रक्षेत्र भेटी, प्रात्यक्षिकाद्वारे प्रचार व प्रसार करून प्रोत्साहित केले आहे. सासकल गावामध्ये एकूण ५ शेतकर्यांनी सुपर केन नर्सरी तयार केली आहे.
यावेळी संतोष मुळे व मच्छिंद्र मुळीक या शेतकर्यांच्या सुपर केन नर्सरी व नर्सरीद्वारे तयार करण्यात आलेल्या ऊस रोप लागवडीस प्रक्षेत्र भेट देऊन शेतकर्यांचे अभिनंदन यावेळी मंडल कृषी अधिकारी यांनी केले.
सुपर केन नर्सरीमध्ये २१ दिवसांत रोपे तयार होतात. ४.५ फूट सरी अंतर असून २ फूट दोन रोपातील अंतर ठेवून लागवड करण्यात आली आहे.
यावेळी मंडल कृषी अधिकारी फलटण सतीश निंबाळकर, मंडल कृषी अधिकारी विडणी शहाजी शिंदे, मंडल कृषी अधिकारी तरडगाव पूजा दुदुस्कर, कृषी पर्यवेक्षक अशोक जगदाळे, कृषी पर्यवेक्षक तरडगाव महावीर पवार तसेच कृषी सहाय्यक सेवारत्न पुरस्कारप्राप्त सचिन जाधव व शेतकरी उपस्थित होते.