डॉ.हेडगेवार स्मृतिमंदिर, गोवारी शहीद स्मारक व दीक्षाभूमीस मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ३० डिसेंबर २०२२ । नागपूर । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रेशीमबाग येथील मुख्यालय, आदिवासी गोवारी शहीद स्मारक व दीक्षाभूमी या शहरातील स्थळांना भेट दिली.

रेशीमबाग येथे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक सरसंघचालक डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृतिमंदिरास भेट देऊन अभिवादन केले. तसेच द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीस्थानाचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचा डॉ.हेडगेवार स्मृती स्मारक समितीच्यावतीने मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी आमदार प्रवीण दटके, आमदार प्रसाद लाड, आमदार मोहन मते तसेच प्रांत संघचालक रामजी हरकरे, अखिल भारतीय सहसंपर्कप्रमुख सुनील देशपांडे, डॉ.हेडगेवार स्मारक समितीचे उपाध्यक्ष श्रीधर गाडगे, कार्यालय प्रमुख विकास तेलंग उपस्थित होते.

आदिवासी गोवारी शहीद स्मारकाला आदरांजली

त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘आदिवासी गोवारी शहीद स्मारक’ येथे भेट दिली. स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून त्यांनी आदरांजली वाहिली. आदिवासी गोवारी शहीद स्मारक समितीचे अध्यक्ष शालिक नेवारे, उपाध्यक्ष चिंतामण वाघाडे, सचिव शेखर लसुनते, कैलास राऊत, राजेश नेवारे, सूरज मनोटे याप्रसंगी उपस्थित होते.

दीक्षाभूमीस भेट

त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीक्षाभूमीला भेट दिली. दोन्ही मान्यवरांनी तथागत गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले. दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव सुधीर फुलझेले आणि सदस्य विलास गजघाटे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.

मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले की,दीक्षाभूमी ही पवित्र भूमी असून दीक्षाभूमीच्या विकासासाठी निधीची कमतरता पडणार नाही. दीक्षाभूमीस पर्यटन क्षेत्रासोबतच तीर्थक्षेत्राचाही ‘अ’ वर्ग दर्जा देण्यात आला आहे,असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी  माध्यमांना सांगितले.


Back to top button
Don`t copy text!