
स्थैर्य, फलटण, दि. ०९ ऑगस्ट : रक्षाबंधनानिमित्त विश्वज्योत इंटरनॅशनल स्कूल, फरांदवाडी येथील विद्यार्थिनींनी आज, दि. ९ ऑगस्ट रोजी फलटण शहर पोलीस ठाण्याला भेट देऊन पोलीस बांधवांना राख्या बांधल्या. या अनोख्या उपक्रमाने पोलीस ठाण्यातील वातावरण भारावून गेले होते, अशी माहिती पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी दिली.
शाळेतील इयत्ता ५ वी आणि ६ वी मध्ये शिकणाऱ्या ४८ विद्यार्थिनींनी या उपक्रमात सहभाग घेतला. वर्गशिक्षिका पुजा सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी पोलीस ठाण्यात येऊन पोलिसांना राख्या बांधल्या. हा आगळावेगळा अनुभव घेताना विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर कुतूहल आणि आनंद स्पष्ट दिसत होता.
यावेळी फलटण शहर पोलिसांच्या वतीने प्रत्येक विद्यार्थिनीला बिस्कीट पुडा आणि पेन्सिल भेट म्हणून देण्यात आली.
या स्तुत्य उपक्रमाबद्दल फलटण शहर पोलीस ठाण्यातर्फे विश्वज्योत इंटरनॅशनल स्कूल, विद्यार्थिनी आणि शिक्षकांचे आभार मानण्यात आले.

