स्थैर्य , मुंबई , दि .२६: राजधानी दिल्लीत कृषी कायद्याला विरोध म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. दरम्यान आता या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी काल हजारोंच्या संख्येने महाराष्ट्रमधील शेतकरी मुंबईच्या आझाद मैदानात दाखल झाले आहेत. या शेतकऱ्यांचा मोर्चा आज राजभवनावर धडक देणार आहे. मात्र या मोर्चाला आम्ही परवानगी दिलेली नसल्याचे मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वासन नांगरे पाटील यांनी सांगितले आहे. दक्षिण मुंबईत मोर्चाला परवानगी देता येत नाही. असा माननीय न्यायालयाचा आदेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विश्वास नांगरे पाटील हे आझाद मैदानावर गेले. त्यांनी आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली. ही भेट घेतल्यानंतर ते म्हणाले की, ‘मोर्चाला मुंबई पोलिसांकडून अधिकृत परवानगी देण्यात आलेली नाही. तरीही राजभवनात जाण्याची त्यांची इच्छा आहे. मात्र कोर्टाच्या आदेशानं दक्षिण मुंबईत मोर्च्याला परवानगी देता येत नाही, या सर्व कायदेशीर गोष्टी आम्ही शेतकऱ्यांना सांगितल्या आहेत’
शिष्टमंडळाने राजभवनात जायला हरकत नाही
विश्वास नागरे पाटील यांनी आज शेतकऱ्यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. राजभवनावर मोर्चा घेऊन जाण्याची परवानगी नाही. मात्र तरीही मोर्चेकऱ्यांचे शिष्टमंडळ राजभवनात जाऊ शकते असेही नागरे पाटील म्हणाले आहेत. मात्र तरीही जर मोर्चेकरांनी राजभवनात जाण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करु असे नागरे पाटील म्हणाले.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त
विश्वास नागरे पाटील म्हणाले की, आंदोलनाला परवानगी नाही. तरीही शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईत कडेकोड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 800 पोलिस कर्मचारी-अधिकारी या ठिकाणी तैनात आहेत. मोर्चाला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही. यासोबतच आंदोलनात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात यावे अशाही सूचना आम्ही दिल्या आहेत. तसेच विविध संस्थांनी मास्क पुरवले आहेत.’