विश्वमैत्री व क्षमापना पर्व सामान्य माणसाला मार्गदर्शक – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी


दैनिक स्थैर्य । दि. २६ सप्टेंबर २०२१ । मुंबई । जगातील सर्वच धर्मांनी मानवजातीला एकसूत्राने बांधले आहे. जैन धर्माने जगाला अहिंसा, अपरिग्रह, क्षमा आणि मैत्रीची शिकवण दिली. विश्वमैत्री व क्षमापना पर्व सामान्य माणसाला नितीमूल्यांच्या मार्गाने मार्गक्रमणा करण्यास मार्गदर्शक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थित आज रविवारी (दि. 26) राजभवन येथे विश्वमैत्री दिवस आणि क्षमापन समारोहाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन भारत जैन महामंडळ या संस्थेतर्फे करण्यात आले होते.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते रुणवाल समूहाचे अध्यक्ष सुभाष रुणवाल, मोतीलाल ओसवाल समूहाचे मोतीलाल ओसवाल, नाहर समूहाचे सुखराज नाहर व रिधी सिद्धी ग्रुपचे प्रमुख पृथ्वीराज कोठारी यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी भारत जैन महामंडळाच्या ‘स्वानुभूती’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमाला आमदार मंगल प्रभात लोढा, भारत जैन महामंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष राकेश मेहता, जैन आचार्य चंद्राननसागर सुरीश्वर व डॉ.मुनी अभिजित कुमार, के सी जैन, मदनलाल मुठलिया, बाबुलाल बाफना, जैन साधू, साध्वी व समाजातील गणमान्य लोक उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!