राजे गटाला पुन्हा धक्का! विशाल पवारांची रणजितसिंहांना साथ; आघाडीचा उमेदवारच रणजितदादांनी फोडला


स्थैर्य, फलटण, दि. २० नोव्हेंबर : फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असतानाच शहराच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडली आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत युवा कार्यकर्ते विशाल पांडुरंग पवार यांनी त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. ऐन निवडणुकीच्या काळात हा विरोधकांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

रणजितसिंहांच्या उपस्थितीत स्वागत

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश सोहळा विशाल पवार यांच्या निवासस्थानी पार पडला. यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विशाल पवार यांचे पक्षात स्वागत केले. रणजितसिंह यांनी विशाल पवार यांना शुभेच्छा देत निवडणुकीत सक्रिय राहण्याचे आवाहन केले.

युवा वर्गात उत्साहाचे वातावरण

विशाल पवार यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या समर्थक आणि युवा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. फलटण पालिकेच्या निवडणुकीत समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला बळकट करण्यासाठी विशाल पवार यांची साथ महत्त्वाची ठरणार आहे. प्रभागातील राजकीय समीकरणे जुळवण्यासाठी आणि तरुणांची मते आकर्षित करण्यासाठी हा प्रवेश निर्णायक ठरू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

विरोधकांची डोकेदुखी वाढणार?

एकीकडे रामराजे आणि अनिकेतराजे गट सक्रिय करण्याच्या प्रयत्नात असतानाच, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ‘मायक्रो प्लॅनिंग’ करत एकेक मोहरा आपल्याकडे वळवण्यास सुरुवात केली आहे. विशाल पवार यांच्यासारख्या युवा कार्यकर्त्याच्या पाठिंब्यामुळे आता संबंधित प्रभागातील लढत अधिक चुरशीची होणार हे नक्की झाले आहे.


Back to top button
Don`t copy text!