
स्थैर्य, फलटण, दि. ११ नोव्हेंबर : फलटण नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक १० मधून राजे गटाचे इच्छुक उमेदवार विशाल पांडुरंग पवार यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. रविवारी त्यांनी शिवाजीनगर, लक्ष्मीनगर आणि जलमंदिर परिसरात आपल्या समर्थकांसह दौरा करत उमेदवारीची प्रभावी मागणी नोंदवली. त्यांच्या या दौऱ्याला प्रत्येक ठिकाणी नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
विशाल पवार यांनी शिवाजीनगर ते जलमंदिर परिसरातील नागरिकांशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रभागाच्या विविध प्रश्नांवर आणि विकासाच्या मुद्यांवर सविस्तर चर्चा केली. परिसरातील तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना आपला पाठिंबा दर्शवत त्यांच्या उमेदवारीचे स्वागत केले. नागरिकांच्या मोठ्या सहभागामुळे या दौऱ्याला विशेष रंगत आली होती.
पवार यांनी राजे गटाच्या प्रमुख नेत्यांकडे आपल्या उमेदवारीची अधिकृत मागणी सादर केली आहे. त्यांनी आमदार श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, माजी आमदार दीपकराव चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर, फलटण बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक-निंबाळकर आणि माजी नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक-निंबाळकर यांच्याकडे ही मागणी केली आहे.
पक्ष नेतृत्वाने आपल्यावर विश्वास दाखवावा आणि प्रभागाच्या विकासासाठी एक व्यापक संधी द्यावी, अशी अपेक्षा विशाल पवार यांनी यावेळी व्यक्त केली आहे. त्यांनी आपल्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचा दाखला देत ही संधी मागितली आहे.
प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल, कोळकी आणि गुणवरे येथील शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून विशाल पवार यांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात सातत्याने काम केले आहे. त्यांची ही ओळख आणि कार्य नागरिकांनीही दौऱ्यादरम्यान अधोरेखित केले.
त्यांच्या उमेदवारीच्या मागणीला मिळत असलेला उत्साहपूर्ण प्रतिसाद पाहता प्रभाग क्रमांक १० मधील राजकीय वातावरणात एक नवे चैतन्य निर्माण झाले आहे. पवार यांच्या या सक्रिय भूमिकेमुळे प्रभागातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आता राजे गट विशाल पवार यांच्या या मागणीचा कसा विचार करतो आणि त्यांना उमेदवारीची संधी देतो का, याकडे संपूर्ण प्रभागाचे लक्ष लागून राहिले आहे.

