
स्थैर्य, दुधेबावी, दि. ३० ऑक्टोबर : येथील दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित संत गाडगेबाबा व्याख्यानमालेतर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय ‘कृषिरत्न’ पुरस्कार सुरवडी येथील विशाल भालचंद्र गाडे यांना प्रदान करण्यात आला. उपमुख्यमंत्री कार्यालयाचे अवर सचिव धीरज अभंग आणि ग्रामीण कथाकथनकार प्रा. रविंद्र कोकरे यांच्या हस्ते हा सन्मान देण्यात आला.
विशाल गाडे यांच्या शेती क्षेत्रातील योगदानाचे कौतुक करून, तरुण शेतकऱ्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन धीरज अभंग यांनी यावेळी केले.
सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत शेतीत कार्यरत राहून, बाजार भावाप्रमाणे पिकांचे नियोजन करतो. सतत एकच पीक न घेता वेगवेगळी पिके घेतल्यास बाजारमूल्य चांगले मिळते, असा अनुभव विशाल गाडे यांनी सत्कारानंतर बोलताना सांगितला. भाऊ वैभव गाडे व कुटुंबीयांच्या सहकार्यामुळे शेती फायदेशीर ठरत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष हनुमंतराव सोनवलकर पाटील, दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत सोनवलकर, उपाध्यक्ष विजयकुमार नाळे, सचिव विठ्ठल सोनवलकर, खजिनदार डॉ. युवराज एकळ, किरण शेंडे, सचिन अभंग, रणजीत साळवे, बाळासाहेब जगताप, दीपक पन्हाळे, नितीन जाधव, गणेश रिटे, अरविंद नाळे यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

