ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करणार – सुनील महाडिक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ११ सप्टेंबर २०२४ | फलटण |
फलटण व तालुक्यात १७ सप्टेंबर रोजी होणार्‍या गणपती विसर्जन मिरवणूक तसेच १९ रोजी होणार्‍या ईद-ए-मिलाद मोहम्मद पैगंबर जयंती मिरवणुकीत ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी साखरवाडी पोलीस चौकी येथे आयोजित साखरवाडीसह परिसरातील गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष व साखरवाडीतील मुस्लीम समाज यांच्या झालेल्या संयुक्त बैठकीमध्ये दिला.

यावेळी साखरवाडीसह परिसरातील छोट्या-मोठ्या गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व मुस्लीम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुनील महाडिक म्हणाले, साखरवाडी परिसरातील गणपती विसर्जन मिरवणूक ही मंडळांनी दिनांक १७ रोजी विसर्जनादिवशीच पूर्ण करावी दुसर्‍या अथवा इतर दिवशी विसर्जन मिरवणुकीची परवानगी कोणत्याही मंडळांना मिळणार नसून यावेळी मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत डीजेसह मोठमोठ्या साऊंड सिस्टीम व लेझर लाईटचा वापर टाळून पारंपरिक वाद्यांचा वापर करावा तसेच मंडळाकडून गणेशोत्सव काळात समाज प्रबोधनपर कार्यक्रमांवर भर द्यावा कोणत्याही मंडळाकडून मिरवणुकीमध्ये ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाई करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी पोलीस प्रशासनाकडून मुस्लीम बांधवांना दि. १६ रोजी होणार्‍या ईद-ए-मिलाद (मोहम्मद पैगंबर) यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जुलूस मिरवणूक ही इतर दिवशी घेण्याचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत मुस्लीम बांधवांनी दि. १६ ऐवजी १९ सप्टेंबर रोजी साखरवाडीमध्ये जुलूस मिरवणूक काढणार असल्याचे जाहीर केले.

यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, सहाय्यक पोलीस फौजदार पांडुरंग हजारे, पो. हवा. महादेव पिसे, अमोल चांगण उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!