
स्थैर्य, सातारा, दि. १९: जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचा भंग करून बारमधून दारू विक्री करत असल्याप्रकरणी बोरगाव पोलिसांनी बारमालकावर गुन्हा दाखल केला आहे. युवराज महादेव घोरपडे (वय 45, रा. खोजेवाडी, ता. सातारा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बारमालकाचे नाव आहे.
शुक्रवारी सकाळी बोरगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना खोजेवाडी गावच्या हद्दीत असलेल्या हॉटेल राज बिअर बार हा सुरू असून खिडकीतून एक व्यक्ती दारूची बाटली घेत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी संबंधित इसमास नाव विचारले असता त्याने स्वतःचे नाव जितेंद्र शरद ओगले (रा.जावळवाडी, ता.सातारा) असल्याचे सांगून हॉटेल राज बिअर बार येथून दारूची बाटली खरेदी केल्याचे सांगितले.
पोलिसांनी हॉटेलचालक युवराज घोरपडे याच्याविरुद्ध जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर, हवालदार विजय साळुंखे, उत्तम गायकवाड, चालक धनंजय जाधव यांनी ही कारवाई केली.