
दैनिक स्थैर्य । दि.२३ जानेवारी २०२२ । सातारा । महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सातारा जिल्हा प्रतिनिधी व दै. पुण्यनगरीचे वृत्तसंपादक विनोद कुलकर्णी यांची कै. प्रतापसिंह महाराज (थोरले) नगर वाचनालयाच्या कार्यकारी मंडळावर सदस्यपदी निवड झाल्याबद्दल माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक सुहास राजेशिर्के यांनी यानिमित्ताने विनोद कुलकर्णी यांचा सन्मान केला.
विनोद कुलकर्णी यांची या आधी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या विश्वस्तपदी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सातारा जिल्हा प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे. साहित्य महामंडळाच्या विश्वस्त पदावर सातारा जिल्ह्यातील प्रतिनिधीला पहिल्यांदाच संधी मिळाली आहे. या निवडीमुळे सातारा जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर बहुमान झाला आहे. दहा वर्षांपूर्वी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेची स्थापना करुन विनोद कुलकर्णी यांनी सातारा साहित्य क्षेत्रात पाऊल ठेवले होते. शाहूपुरी शाखेचे गेली दहा वर्षे ते संस्थापक अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. पहिल्यांदाच सर्वाधिक तरुण जिल्हा प्रतिनिधी म्हणून निवडून येण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे.
तसेच 168 वर्षांची परंपरा असलेले कै. प्रतापसिंह महाराज (थोरले) नगरवाचनालय सातारा जिल्ह्याचे केंद्रबिंदू आहे. या नगरवाचनालयात दोन लाख पुस्तके असून अति दुर्मिळ ग्रंथही या वाचनालयात उपलब्ध आहेत. तसेच या वाचनालयात अभ्यासिका वर्ग ही चालू आहे. अशा नावाजलेल्या वाचनालयावर विनोद कुलकर्णी यांची कार्यकारी मंडळावर सदस्य पदी एकमताने निवड झालेली आहे. त्यांच्या या निवडीने नगर वाचनालयाला वेगळीच ऊर्जा निर्माण होईल असा विश्वास माजी उपनगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक सुहास राजेशिर्के यांनी व्यक्त केला आहे.