स्थैर्य, पांचगणी, दि. २० : पाचगणी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत नगराध्यक्षा सौ. लक्ष्मी कर्हाडकर यांनी बहुमतात गेलेल्या विरोधकांना धोबीपछाड देत विनोद वसंतराव बिरामणे यांच्या पारड्यात कास्टिंग व्होट टाकत दुसर्यांदा उपनगराध्यक्षपद बहाल केले.
पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याबाबत पाचगणीकरांमध्ये उत्सुकता लागून राहिली होती. या निवडीसाठी पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच आज पाचगणी नगरपरिषद कार्यालयात ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विशेष सभा घेण्यात आली. दि. 6 जुलै रोजी उपनगराध्यक्ष अनिल वन्ने यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती. त्यानंतर कोरोना संकट उद्भवल्याने या निवडी रेंगाळल्या होत्या. त्यामुळे नव्या उपनगराध्यक्ष निवडीसाठी ही सभा बोलावण्यात आली होती. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या वेळेत विनोद बिरामणे यांचे दोन अर्ज तर तर सौ. अर्पणा मिलिंद कासुर्डे यांचा एक अर्ज दाखल झाला. दोन अर्ज दाखल झाल्याने निवडणूक मतदानावर आली. यावेळी ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग पद्धतीने हात वर करून मतदान झाले. यामध्ये विनोद बिरामणे यांना 9 मते पडली तर अर्पणा कासुर्डे यांना 9 मते पडली. समसमान मते पडल्याने शेवटी नगराध्यक्षांना कास्टिंग व्होटचा अधिकार असल्याने नगराध्यक्षा सौ. लक्ष्मी कर्हाडकर यांनी विनोद बिरामणे यांच्या बाजूने हात वर केल्याने या निवडणुकीत विनोद बिरामणेे हे एका मताने विजयी झाले व ते दुसर्यांदा उपनगराध्यक्षपदाच्या खुर्चीत विराजमान झाले.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नगराध्यक्षा सौ. लक्ष्मी कर्हाडकर यांनी काम पाहिले. यावेळी मुख्याधिकारी गिरीश दापकेकर उपस्थित होते. यापूर्वी नगराध्यक्ष गटाकडे चार नगरसेवक होते व ेविरोधात 13 नगरसेवक होते. त्यामुळे यावेळी उपनगराध्यक्षपद हे अध्यक्षांच्या विरोधातील गटाकडे जाणार ही चिन्हे होती. परंतु राजकारणात प्रत्येक वेळी चाणाक्षता दाखवणार्या सौ. कर्हाडकर यांनी यावेळीही विरोधी गटाला धोबीपछाड देत त्यांचे चार नगरसेवक फोडत पुन्हा एकदा उपाध्यक्षपदही आपल्याकडेच राखले. नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष विनोद बिरामणे यांच्या निवडीने त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी केली. पालिका सभागृहातील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केले.
सौ. कर्हाडकर म्हणाल्या, शहर विकासासाठी आम्ही आमची सर्व ताकद पणाला लावणार आहोत. नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष विनोद बिरामणे यांनी सांगितले, सौ. कर्हाडकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विकासाचा कार्यक्रम राबवणार असून सहकार्यांनी दाखवलेला विश्वास सार्थ करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.