स्थैर्य, दि.६: राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये ताळमेळ नसल्याची टीका सुरुवातीपासूनच केली जात असते. तसेच महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये मतभेद असल्याचे अनेक वेळा समोर आले आहे. आता पुन्हा एकता असेच चित्र निर्माण झाले आहे. शिवसेनेच्या विनायक राऊतांनी काँग्रेसच्या अमित देशमुखांवर टीका केली आहे.
वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी कोकणातील प्रकल्प लातूरला नेण्याची मागणी केली आहे. याच कारणावरुन शिवसेनेने देशमुखांवर टीका केली आहे. महाविकास आघाडीत प्रकल्पांची पळवापळवी होऊ नये, वरिष्ठांनी याविषयी मध्यस्थी करावी, अशी मागणी शिवसेनेचे खासदार विनायक राऊतांकडून करण्यात आली आहे. विनायक राऊतांनी प्रसार माध्यमांशी बोलताना देशमुखांच्या मागणीवर नाराजी व्यक्त केली.
विनायक राऊत यांनी महाविकास आघाडीत प्रकल्पांची पळवापळव होऊ नये यासाठी वरिष्ठांना मध्यस्थी करण्याची विनंती केली आहे. वरिष्ठ नेत्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केल्यास आघाडीत समन्वय राहील असेही राऊत म्हणाले आहेत. यासोबतच सिंधुदुर्गाच्या वाट्याला येणारा प्रकल्प पळवून नेण्याच्या प्रयत्नाचा आम्ही तीव्र शब्दांमध्ये धिक्कार करत असल्याचेही ते म्हणाले आहेत. कोकणातले असे अनेक प्रकल्प पळवण्याचे प्रयत्न झाल्याचेही ते म्हणाले. तसेच अमित देशमुखांना यासंदर्भात चर्चा करण्यासाठी वेळ मागितला मात्र त्यांनी दिला नाही असेही ते म्हणाले.
अमित देशमुख यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल प्लांट लातूरला नेण्याची मागणी केली होती. केंद्र सरकारचा हा प्रकल्प दोडा मार्गावरील आढाळी येथे उभारण्यात येणार आहे. आयुष मंत्रालयाकडून त्याला मंजुरीही देण्यात आलेली आहे. मात्र, अमित देशमुख यांनी अचानक हा प्रकल्प लातूरला हलवण्याची मागणी केली. मात्र त्यांच्या या मागणीला शिवसेनेचा विरोध आहे. यामुळे महाविकास आघाडीमध्ये ताळमेळ नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.