स्थैर्य, सातारा, दि. २०: कोरोनाच्या प्रादुर्भाव कमी होत असला तरी गाफील राहून चालणार नाही. आपले गाव कोरोनामुक्त झाले पाहिजे आणि ते कायम कोरोनामुक्त राहिले पाहिजे यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत. आपले गाव आणि भागाच्या कोरोनामुक्तीसाठी ग्रामस्थांनी कायम सतर्क राहावे, असे आवाहन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या विशेष प्रत्नातून आणि त्यांच्या आमदार फंडातून बामणोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उभारण्यात आलेल्या ऑक्सिजनयुक्त कोरोना केअर सेंटर व आपटी आरोग्य उपकेंद्र येथील कोरोना विलगिकरण कक्षाचे आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार राजेंद्र पोळ, गट विकास अधिकारी सतीश बुद्धे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भगवान मोहिते, डॉ.ज्ञानेश्वर मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वत्र कोरोनाने हाहाकार केलेला असताना ठीक ठिकाणी ऑक्सिजन बेड कमी पडत असल्याने रुग्णांची हेळसांड होत होती. हे लक्षात घेऊन आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र बामणोली या ठिकाणी आमदार फंडातून दहा बेडचे सुसज्ज असे ऑक्सिजनयुक्त कोरोना सेंटर सुरू केले. तसेच नवतरुण ग्रामविकास मंडळ मुंबई, आपटी व बजरंग सपकाळ यांच्या अर्थसहाय्यातून आपटी या ठिकाणी उभारण्यात आलेले वीस बेडचे विलगिकरण कक्ष या दुर्गम भागातील रुग्णांसाठी संजीवनी ठरणार आहे. दुर्गम व डोंगराळ बामणोली भागातील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन बामणोली आरोग्य केंद्राला कोरोना केअर सेंटर सुरू केले असून, सुसज्ज रुग्णवाहिका देखील उपलब्ध करून दिली आहे. या भागातील लोकांच्या आरोग्यासह इतरही सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील असून,आपटी आरोग्य उपकेंद्रातील रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले. बामणोली येथील दहा बेड व आपटी येथे वीस बेड असल्याने यापुढील काळात या भागातील लोकांना आता मेढा किंवा सातारा या ठिकाणी जाऊन बेड शोधत बसण्याची वेळ येणार नाही. तरी देखील भागातील सर्व ग्रामस्थांनी शासनाने घालून दिलेले सर्व नियम पाळावेत व प्रशासनास सहकार्य करावे आणि कोरोनाला दूरच रोखवे असे देखील शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले. यावेळी समाजसेवक ज्ञानदेव रांजणे, राम पवार, यशवंत आगुंडे, सदाभाऊ शिंदकर, राजेंद्र संकपाळ, बामणोलीच्या सरपंच जयश्री गोरे आर .डी.भोसले, प्रकाश शंकर सुतार, बामणोली भागातील विविध गावांचे सरपंच, सदस्य पोलीस पाटील, ग्रामसेवक, सर्कल, तलाठी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.