दहिगाव ता.कोरेगाव येथे स्मशानभूमीत गावकऱ्यांनी साकारलेल्या क्रीडांगणाचे उद्घाटन करताना गावचे राष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळाडू,ग्रामस्थ उपस्थित होते. |
स्थैर्य, पिंपोडे बुद्रुक,दि. ११ : नेहमी नव्याचा ध्यास व शोध घेणारे दहिगाव ता.कोरेगाव येथील ग्रामस्थांनी गावांतील मुलानंसाठी चक्क वैकुंठ स्मशानभूमीतच अनेक खेळातील प्रकाराचे भव्य क्रीडांगण उभारले असुन याकामी गावकऱ्यांच्या सहभागासह लोकगौरव विकास फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे.
कधीकाळी दुष्काळाचा सामना करणार गांव स्वयंस्फूर्तीने पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले आहे.जल हैं तो कल हैं । या उक्तीला साजेसे काम केले आहे.पाणीदार चळवळ बळकट करण्यासाठी व पाण्याचे महत्व ओळखलेल्या ग्रामस्थांनी चक्क स्मशानभूमीत रेनहार्वेस्टिंग प्रकल्प उभारला आहे.पाण्याचा उपयोग पिण्यासाठी केला जात आहे. स्मशानभूमीत पत्र्याच्या शेड्ला पाईपलाईन जोडण्यात आल्या आहेत.पावसाचे पाणी या पाईपलाईन मधून शेडलगत असणाऱ्या बोअरवेलमध्ये सोडले आहे आणि या बोअरवेलचे पाणी गावच्या पाणीपुरवठा विहिरीत सोडले जाते.पुढे हे पाणी फिल्टर करुन गावाला पाणी पुरवठा केला जातो.लोकगौरव विकास फाउंडेशन हे नावासाठी नसून गावासाठी काम करणारे व्यासपीठ आहे.दरवर्षी गावासाठी काही ना काही विधायक कार्य करतं राहण्याचा संकल्प आणि प्रत्यक्ष कृतीवर भर दिला जातो मंग ते वैकुंठ धाम मधील वृक्ष लागवड असो अन्यथा पाणी प्रकल्प, पुरग्रस्तानां मदत, गौरी सजावट स्पर्धा, वृध्दआश्रमास मदत, किल्ले व रांगोळी स्पर्धा, विविध विषयावर व्याख्यान, विशेष पुरस्कार, राष्ट्रीय सेवा योजना शिबिर अनेक उपक्रमाच्या माध्यमातुन गावच्या युवा पिढीचे बौध्दिक विकासाला चालना देण्याचे काम फाउंडेशन करीत आहे. स्मशानभूमीचे नुसते नावं काढले तरी अनेकांच्या डोक्यात स्मशान शांतता होते. माणसाच्या आयुष्यातील अंतिम वाट असल्यामुळे त्या रस्त्याकडे आणि त्या परिसराकडे लोक जाण्यास धजावत नाहीत. पूर्वीच्या गैरसोयी पेक्षा सध्या बहुतांशी गावांत स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी शेड व फुल बाग, भौतिक सुविधा केल्या जात आहेत, तर काही गावांत स्मशानभूमीच्या जागेचा अभाव व गैरसोय आहे, त्यावेळी नदीच्या काठावर छोट्याश्या जागेत गावकऱ्यांचा अंत्यविधी उरकला जात आहे हे सुध्दा चित्र अनेक गावांत दिसत आहे. मात्र दहीगांवकरांनी वैकुंठधाम हे मंदिर मानून या ठिकाणी स्मशान भूमीचे रुपपालटले जात आहे. आजच्या आधुनिकतेच्या व मोबाईलच्या जमान्यात मुलांचे मैदानी खेळ कमी झाले आहेत. मुलांच्या खेळाला आणि व्यायामाला अधिक महत्व देत मुलांच्या आग्रहास्तव त्यांना खेळण्याकरिता निसर्गरम्य वातावरणात वसनामाई नदीच्या काठी वैकुंठधाम स्मशानभूमी शेजारी भव्य दिव्य असे तीस गुंठे जागेमध्ये क्रीडांगण तयार केले आहे. त्यामध्ये हॉलिबॉल, फुटबॉल, कब्बड्डी,उंच उडी,लांब उडी,सिंगल बार,डबल बार, गोळाफेक,थाळीफेक या मैदानी खेळांची साहित्यासह सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. याचे उद्घाटन जेष्ठ कबड्डीपट्टु मधुकर मामा चव्हाण,राष्ट्रीय रब्बी खेळाडू तेजस जगताप,राज्यस्तरीय कबड्डीपटू ओंकार चव्हाण,राष्ट्रीय बेडमिंटनपटू सिध्दी जाधव,या गावच्या आजी माजी खेळाडूंच्या, ग्रामस्थांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. या क्रीडांगणाचा उपयोग मुला-मुलींना पोलीस, आर्मी, सैन्यदल, नेव्ही आणि इतर भरती होण्याकरिता आणि शालेय, महाविद्यालयिन खेळाडू घडविण्यासाठी व गावाचे नावं उज्वल करण्यासाठी निश्चित उपयोग होईल या करिता फांऊडेशन विविध प्रकल्पासह प्रोत्साहन व चालना देण्याची भूमिका बजावत आहे. याचे ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील क्रिडा प्रेमीकडून समाधान व कौतुक केले जात आहे.