
स्थैर्य, बारामती, दि. १३ ऑगस्ट : बारामती एमआयडीसीमधील विमानतळाजवळील रेल्वे गेट कायमस्वरूपी बंद करण्याच्या हालचालींना स्थानिक नागरिक आणि परिसरातील ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे. उड्डाणपुलामुळे पाच ते सहा किलोमीटरचा वळसा पडणार असल्याने वेळ आणि पैशाचा अपव्यय होईल, असे सांगत नागरिकांनी आंदोलन करून हे गेट बंद करू नये, अशी मागणी केली आहे.
संत तुकाराम महाराज उड्डाणपूल झाल्याने नागरिकांनी त्याचा वापर करावा, असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, या उड्डाणपुलामुळे एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये जाण्यासाठी किंवा छोटे-मोठे व्यावसायिक व्यवहार करण्यासाठी अंतर वाढणार आहे. याचा फटका गेट परिसरात असलेल्या हॉटेल, पेट्रोल पंप आणि इतर व्यावसायिकांना बसणार असून, ग्राहक कमी होऊन व्यवसाय बंद पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
विद्या प्रतिष्ठानसारख्या संस्थांमध्ये सायकल किंवा एसटीने जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे अंतर उड्डाणपुलामुळे वाढणार आहे. उड्डाणपुलावर एसटी थांबा नाही, मात्र गेटजवळ आहे. त्यामुळे गेट बंद केल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होईल, असे मत विद्यार्थी मनोज शिंदे यांनी मांडले.
पर्यायी रस्त्याची मागणी
रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूला अनेक विद्यार्थी आणि वाहन नसलेले रहिवासी आहेत. त्यांच्यासाठी रेल्वे प्रशासनाने आधी पर्यायी रस्ता तयार करावा आणि त्यानंतरच गेट बंद करावे, अशी मागणी रहिवासी पांडुरंग जगताप यांनी केली आहे.
शासकीय धोरणानुसार गेट बंद
ज्या ठिकाणी महामार्गासाठी उड्डाणपूल झाला आहे, तेथील रेल्वे गेट बंद करून उड्डाणपुलावरील वाहतूक सुरळीत करावी, असे राज्य शासनाने केंद्र शासनाला कळवले आहे. रेल्वे गेटवरील अपघात टाळण्यासाठी हे धोरण असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.