
दैनिक स्थैर्य । 7 एप्रिल 2025। सातारा । सातारा जिल्ह्यात उन्हाच्या झळा तीव्र झाल्या असल्याने टंचाईही वाढू लागली आहे. त्यामुळे माण तालुक्यातच सध्या 27 गावे आणि 208 वाड्यांसाठी टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. या टँकरवरती 44 हजार लोकांची तहान अवलंबून आहे. सध्या माण तालुक्यातच टंचाई आहे. तरीही दिवसेंदिवस माण तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांची संख्याही वाढू लागलेली आहे. माण तालुक्यात सुरुवातीला 6 गावे आणि 67 वाड्यांत टंचाई होती. यासाठी प्रशासनाने टँकर सुरू केले. मात्र, आता टंचाईच्या गावांची संख्या वाढली आहे. सध्या. 27 गावे आणि 208 वाड्यांना टंचाईची झळ बसलीय.
सातारा जिल्ह्यात दरवर्षीच उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट उभे राहते. त्यामुळे चार महिने तरी लोकांना आणि पशुधनालाही टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. यामध्ये माण, खटाव, फलटण आणि कोरेगाव या दुष्काळी तालुक्यात टंचाईची भीषणता असते. त्यातच जिल्ह्यात गेल्यावर्षी अधिक पर्जन्यमान झाले होते. त्यामुळे टंचाईला उशिरा सुरुवात होईल असा अंदाज होता. मात्र, फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासूनच टंचाई निवारणासाठी टँकर धावू लागले आहेत.
सातारा जिल्ह्यात एप्रिलपासून टंचाई आणखी वाढणार आहे. त्यामुळे जिल्हा ग्रामीण पुरवठा विभागाने एप्रिल ते जून या महिन्यांचा संभाव्य टंचाई आराखडा तयार केला आहे. जिल्ह्यात 473 गावे आणि 657 वाड्यांना टंचाईची झळ बसू शकते. यासाठी 14 कोटी 62 लाख रुपये खर्चाचा अंदाज आहे. टंचाई निवारणासाठी उपायांची गरज आहे.
माणमध्ये सुरुवातीला शासकीय टँकरनेच पाणीपुरवठा करण्यात येत होता. पण, टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढली असल्याने खासगी टँकरही सुरू करावे लागलेत. सध्या 30 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये शासकीय 10 आणि खासगी 20 टँकरचा समावेश आहे. तसेच पाच विहिरी आणि एका बोअरवेलचेही अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
टँकरवर 43 हजार 911 नागरिक अवलंबून आहेत. दहिवडी मंडलातील बिजवडी, पांगरी, येळेवाडी, पाचवड आणि राजवडी येथे टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच शिंगणापूर मंडलात मोही, डंगिरेवाडी, थदाळे, वावरहिरे आणि अनभुलेवाडी येथे तर म्हसवड मंडलातील धुळदेव, वरकुटे म्हसवड, कारखेल, हवालदारवाडी, भाटकी, खडकी, रांजणी आणि संभूखेडला टँकर सुरू आहेत. तसेच गोंदवले बुद्रुक मंडलात जाशी, पळशी आणि माडौँ मंडलात मार्डीसह खुटबाव, इंजबाव आणि पर्यंतीला हे टैंकर सुरू आहेत.
मलवडी मंडलातील वारुगड येथेही टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. आंधळी आणि कुकुडकवाड मंडलातही नव्याने टँकर सुरू झाले आहेत. टाकेवाडी आणि दोरगेवाडीला हा पुरवठा सुरू आहे. तर माण तालुक्यातील आणखीही काही गावांनी टँकरची मागणी केलेली आहे. त्यामुळे तेथेही लवकरच टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे.
माण तालुक्यातील नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागतोय. तसेच पशुधनालाही टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. सध्या टंचाईग्रस्त गावांतील 22 हजार 238 पशुधनाला टँकरच्याच पाण्याचा आधार आहे.