दैनिक स्थैर्य । दि. ०८ एप्रिल २०२३ । वडूज । सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली असतानाच सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये वार्षिक यात्रेचा मोसम सुरू झालेले आहे. कुलदैवत व श्री ची आठवण काढली जात आहे. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले असले तरी सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात श्रीच्या वार्षिक यात्रेसाठी राजकीय मतभेद विसरून भाविक समजून सर्वजण एकत्रित वर्गणी गोळा करत असल्याचे चित्र दिसत आहे.
राजकारण म्हणजेच गावकी असा काहींचा समज झालेला आहे. त्यामुळे भावकी यांच्यामध्ये अधून मधून राजकीय कलंगी तुरा दिसत असतो. विविध पक्षांमध्ये काम करणारे अनेक कार्यकर्ते आहेत. गावगाडा चालवत असताना प्रत्येकाची मर्जी सांभाळावी लागते. काही वेळेला निर्णय घेताना अडचणी येतात. अनेकदा वादावादीचे प्रसंग घडले आहेत. त्यामुळे पूर्वी एक गाव एक वार्षिक यात्रा असे सुरू होते. पण, आता सध्या काही मोठ्या गावामध्ये दोन ते तीन यात्रा भरवल्या जात आहेत. याला काही गाव अपवाद असले तरी त्यांच्या समंजसपणाबद्दलही कौतुक होत आहे.
प्रत्येक गावातील वार्षिक यात्रेसाठी किमान १५ ते २० लाख रुपये खर्च केला जातो. हा खर्च गावातील दानशूर व्यक्ती, ग्रामस्थ व संस्था- दुकानदार यांनी दिलेल्या देणगीतून केला जातो. विशेष म्हणजे ग्रामीण भागाचा कणा म्हणून बैलगाडी शर्यत, कुस्त्यांचा आखाडा, देवाचा हळदी कार्यक्रम, श्री चा विवाह सोहळा, मिरवणूक, छबिना, मुख्य मिरवणूक, तमाशा, मनोरंजनाचे कार्यक्रम, महाप्रसाद व तरुणाईला आकर्षित करणारे फटाकेबाजी व झांज पथक, डॉल्बी, डी जे, भारूड, गोंधळ अशा विविध कार्यक्रमासाठी प्रत्येकी किमान लाखभर रुपये खर्च करावाच लागतो. या व्यतिरिक्त पारंपारिक रित्या देवाची पूजाअर्चा सुद्धा केली जाते. सध्या राजकीय कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते यांना वार्षिक यात्रा कमिटीने सहभाग करून घेतले आहे.
राजकारण विरहित वार्षिक यात्रा असे स्वरूप दिल्यामुळे गावोगावी ग्रामस्थ व कार्यकर्ते वर्गणी गोळा करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. गावचा एकोपा पाहून काहींना अक्षरशा जास्त वर्गणी द्यावी लागत आहे. ग्रामीण भागामध्ये सर्वच राजकीय पक्षांमध्ये कार्यकर्ते विखुरलेले आहेत. प्रत्येकाची वैचारिक भूमिका वेगवेगळ्या आहे. पण, यात्रा कमिटी मध्ये सहभागी झालेले सर्व ग्रामस्थ व कार्यकर्ते हे प्रथम भाविक आहेत. त्याच्यानंतर राजकीय कार्यकर्ते आहेत. हेच सिद्ध करून दाखवलेला आहे.
ग्रामीण भागामध्ये आपलं पद व आपली भूमिका विसरून एका दिल्याने वर्गणी गोळा करत आहेत. तसेच आपल्या गावातील वार्षिक यात्रेला कोणतेही गोल बोट लागू नये याची सुद्धा काळजी घेत आहेत. यासाठी यात्रा कमिटीचे सर्व पदाधिकारी ग्रामस्थ व शासकीय यंत्रणा यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. यात्रा कमिटी पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित राहत आहेत.
खटाव तालुक्यातील वडूज मध्ये ग्रामदेवता साठी भर उन्हातही परेश जाधव, चंद्रकांत काळे, संजय अंबिके, विजय शेटे, बापू ननावरे, निलेश करपे, काका बनसोडे, आकाश जाधव, बाळासाहेब काळे, प्रा. संजय कुंभार, पपू गोडसे, बनाजी पाटोळे, भय्या बोकरे, रणजीत गोडसे यांच्या सह शशिकांत पाटोळे व वार्षिक यात्रा कमिटी सहभागी झाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आहे.