दैनिक स्थैर्य । दि. ३१ जुलै २०२२ । कोरेगाव । फडतरवाडी तालुका कोरेगाव येथे अंत्यविधी करण्यासाठी जागा नसल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायत समोर अंत्यविधी करण्याचा पवित्रा घेतला होता. दरम्यान कोरेगावचे तहसीलदार अमोल कदम यांनी स्मशानभूमीच्या जागेसाठी मार्गदर्शन करून वनविभागाची जागा हस्तांतर करण्यासाठी प्रस्ताव देण्याची सूचना केली. त्यानंतर 21 तासानंतर दुपारी 12 वाजता शेतात अंत्यविधी पार पडला.
फडतरवाडी, ता. कोरेगाव येथे स्मशानभूमी नसल्याने अंत्यविधी करण्यासाठी लोकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. लोकांना स्वत:च्या शेतात अंत्यविधी करावा लागतो. पावसाच्या दिवसात लोकांना गुडघाभर चिखलातून मार्ग काढावा लागतो. ग्रामपंचायत कडून वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून हा प्रश्न सुटला गेला नाही. काल गुरुवार दि. 28 रोजी दुपारी तीन वाजता एका 58 वर्षीय महिलेच निधन झालं. पाऊस झाल्याने अंत्यविधीसाठी शेतात जाऊ शकत नसल्याने कुटुंबीयांनी तसेच ग्रामस्थांनी ग्रामपंचायत समोर अंत्यविधी करण्याचा पवित्रा घेतला. दरम्यान, सकाळी 10 वाजता प्रशासनाच्या वतीने तहसिलदार अमोल कदम, गट विकास अधिकारी क्रांती बोराटे, वाठार वन परीमंडलाचे वन पाल एस. एस निकम, वाठार पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर यांनी गावात येऊन ग्रामस्थांबरोबर चर्चा केली. चर्चेदरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तहसिलदार कदम यांनी गावालगत असलेल्या दोन ठिकाणच्या जागा पाहून त्या जागेबाबत तलाठी व वनअधिकारी यांच्या सोबत चर्चा करून गावालगत असलेली वनविभागाची जागा स्मशानभूमीसाठी हस्तांतर करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यास सांगून यावर तोडगा काढला. तहसिलदार कदम यांच्या आश्वासनानंतर दुपारी बारा वाजता शेतात अंत्यविधी करण्यात आला.