शिंदे गटाला खिंडार! माजी नगरसेवक विकास राऊत यांची ‘घड्याळा’ची साथ


  • फलटण नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाला धक्का

  • माजी नगरसेवक विकास राऊत यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

  • सातारा जिल्हा उपाध्यक्षपदाची मोठी जबाबदारी

स्थैर्य, फलटण, दि. 21 नोव्हेंबर : फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीचे वातावरण तापलेले असतानाच शिवसेना शिंदे गटला मोठा राजकीय धक्का बसला आहे. माजी नगरसेवक विकास राऊत यांनी शिंदे गटाला ‘जय महाराष्ट्र’ करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये (अजित पवार गट) जाहीर प्रवेश केला आहे. पक्षात प्रवेश करताच त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

ऐन निवडणुकीत पक्षांतर

फलटणमध्ये सध्या भाजपा-राष्ट्रवादी (युती) विरुद्ध शिवसेना शिंदे गट (राजे गट) असा थेट सामना रंगला आहे. अशातच माजी नगरसेवक विकास राऊत यांनी आपली राजकीय भूमिका बदलत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. निवडणुकीच्या धामधुमीत एका सक्रिय माजी नगरसेवकाने पक्ष सोडल्याने स्थानिक समीकरणांवर याचा परिणाम होणार आहे.

जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी

विकास राऊत यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली आहे. त्यांच्या या निर्णयाचे स्वागत करत पक्षाने त्यांच्यावर तत्काळ सातारा जिल्हा उपाध्यक्षपदाची मोठी जबाबदारी सोपवली आहे. आगामी नगरपालिका निवडणुकीत पक्षाचे काम तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा फायदा होणार आहे.

आमदारांकडून स्वागत

यावेळी आमदार सचिन पाटील यांनी विकास राऊत यांचे पक्षात स्वागत केले. तसेच जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करत पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विकास राऊत यांच्या येण्याने युतीची ताकद नक्कीच वाढेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


Back to top button
Don`t copy text!