दैनिक स्थैर्य । दि. ३० नोव्हेंबर २०२१ । मुंबई । राष्ट्रीय विजेते कबड्डीपटू आणि ‘भारत श्री’ हा किताब मिळविणारे राज्याचे पहिले विजेते शरीरसौष्ठवपटू विजू पेणकर यांचे ‘योद्धा’ खेळचरित्र हे संघर्षातून निर्माण झालेल्या व्यक्तीमत्त्वाचा गौरव असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केले.
‘भारत श्री’ विजू पेणकर यांच्या ‘योद्धा’ या खेळचरित्राचे प्रकाशन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. हा प्रकाशन सोहळा माझगाव येथील सर एली कदुरी शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार रविंद्र वायकर, आमदार शशिकांत शिंदे, ज्यूईश फेडरेशनचे जॅानथन सॅालोमन, व्यायाममहर्षी मधुकर तळवलकर, डेवीड तळेगावकर, प्रकाशक प्रज्ञा जांभेकर-चव्हाण आदी उपस्थित होते. ज्येष्ठ क्रीडा पत्रकार संदीप चव्हाण लिखित हे पुस्तक सदामंगल पब्लिकेशनने प्रकाशित केले आहे.
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, राज्यातील पहिले भारतश्री, शरीरसौष्ठव आणि गरीब परिस्थितीतून संघर्षातून निर्माण झालेल्या व्यक्तीमत्वाचा गौरव ही आनंदाची बाब आहे. कबड्डीच्या मैदानात आणि चित्रपटाच्या पडद्यावर नाव कमाविणारे विजू पेणकर यांच्या जीवनावर आधारित ‘योद्धा’ हे खेळचरित्र पुस्तकरुपात आले आहे. हे महाराष्ट्रासाठी गौरवास्पद आहे. या खेळचरित्रातून नवीन ताकद निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करुन क्रीडापटूंच्या मागण्या मान्य करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे श्री.मुंडे यांनी सांगितले.
विजू पेणकर यांनी त्यांच्या जीवनातील आठवणींना उजाळा दिला. तसेच क्रीडापटूंना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने जास्तीत निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी देखील श्री. पेणकर यांनी यावेळी केली.
माजी मंत्री आमदार रविंद्र वायकर म्हणाले, राज्याचे पहिले विजेते शरीरसौष्ठवपटू विजू पेणकर यांच्या जीवनावर आधारित ‘योद्धा’ हे खेळचरित्र, त्यांचे जीवनातील संघर्ष आणि यश मिळविण्याची जिद्द नक्कीच प्रेरणादायी आहे.अशीच कारकीर्द गाजवणाऱ्या देश पातळीवर आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या महाराष्ट्रातील पुरस्कार विजेत्यांच्या आत्मचरित्रांसाठी दालन निर्माण व्हावे, असे मत श्री. वायकर यांनी व्यक्त केले.
क्रीडा आणि कला या दोन्ही क्षेत्रात जिद्दीने यश मिळविणाऱ्या विजू पेणकरांचे कर्तृत्व नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. विविध क्षेत्रात देशाचे सर्वोच्च पुरस्कार मिळविणाऱ्या राज्यातील विजेत्यांचेही आत्मचरित्र निर्माण व्हावे, त्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा, अशी भावना आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केली.
मुंबईतील डोंगरी-उमरखाडी भागात कबड्डी नाव लौकिक मिळवत असतांना शरीरसौष्ठव खेळातही विजू पेणकर यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला. १९७० च्या दशकात आपल्या खेळाने श्री. पेणकर यांनी कबड्डीवर अधिराज्य गाजवले. कबड्डीसोबतच १९७२ मध्ये शरीरसौष्ठ स्पर्धेतील सर्वोच्च असा ‘भारत श्री’ किताबही श्री. पेणकर यांनी पटकावला. १९७२ मध्ये बोर्नव्हिटाच्या जाहिरातीसाठी त्यांची निवड झाली होती, अशी माहिती यावेळी देण्यात आली.