विजय थोरात सातारा पालिकेचे नवे मुख्याधिकारी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. १९: सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांची पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उपायुक्तपदी पदोन्नतीने बदली झाली आहे. तर भोरचे मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात यांची सातारा पालिकेच्या मुख्याधिकारीपदी वर्णी लागली. त्यांनी यापूर्वी शिरूर, दौंड व भोर पालिकेत मुख्याधिकारी म्हणून काम केले आहे.

खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याशी प्रशासकीय कामकाजाचा उत्तम समन्वय साधणारे अभिजीत बापट यांची सोलापूर महापालिकेतून सातार्‍यात दि. 12 ऑगस्ट 2020 रोजी मुख्याधिकारी म्हणून बदली झाली होती. सोलापूर उपायुक्त पदाची जवाबदारी नाकारणार्‍या अभिजीत बापट यांना सातार्‍यात आणण्यासाठी मोठी राजकीय मोर्चेबांधणी झाल्याने तत्कालीन मुख्याधिकारी रंजना गगे यांना पुणे महानगरपालिकेत बदलून जावे लागले. कोरोनाचा संक्रमणकाळ, प्रशासकीय कामांना गती देण्याचा प्रयत्न, नगरोत्थानच्या निधीसाठी विकास कामांचे नवीन प्रस्ताव सुरू असताना मुख्याधिकारी अभिजीत बापट यांची पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उपायुक्तपदी तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नतीने वर्णी लागल्याचा लेखी आदेश नगर विकास विभागाला शुक्रवारी उशीरा प्राप्त झाला आहे. संबधितांना तत्काळ कार्यमुक्त करावे, अशा सूचना जिल्हाधिकार्‍यांना करण्यात आल्या आहेत.

अभिजीत बापट यांनी 2012-16 या दरम्यान जिल्हा प्रकल्प संचालक, व सातारा पालिका मुख्याधिकारी अशी सलग सेवा बजावली सातार्‍याच्या विविध प्रश्‍नांचा त्यांचा सखोल अभ्यास होता. मात्र ते सातार्‍यात रूळण्यापूर्वीच त्यांची रवानगी पुण्याला झाली.
बापट यांची बदली झाल्याने भोरचे मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात यांच्याकडे सातारा पालिकेची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. कर्मचार्‍यांना सांभाळून घेणारा व प्रशासनावर वचक असणारा अधिकारी म्हणून थोरात यांची ओळख आहे. त्यांनी यापूर्वी शिरूर, दौंड व भोर पालिकेत मुख्याधिकारी म्हणून काम केले आहे.


Back to top button
Don`t copy text!