स्थैर्य, सातारा, दि. २२ : ज्ञानगणेश, संगीतगणेश, क्रीडागणेश, अर्थगणेश अशा विशिष्ट संकल्पनांवर आधारित असलेल्या सजावटी घरगुती गणपतीसमोर करणाऱ्या साताऱ्यातील पाठकजी कुटुंबीयांनी यंदा ‘विघ्नहर्ता’ ही संकल्पना घेऊन सजावट केली आहे. करोनाच्या संकटकाळात चित्ररूपी मांडणीतून करोनायोद्ध्यांना सलाम करण्यात आला असून, देशावर चहूबाजूंनी आलेल्या संकटामध्ये सर्वसामान्यांसाठी अहोरात्र उभ्या असलेल्या सैन्यदलांप्रती आदरही या सजावटीतून व्यक्त करण्यात आला आहे. साताऱ्यातील ज्येष्ठ कलाशिक्षक शेखर हसबनीस यांनी या सजावटीसाठी चित्र आणि ग्राफिक्स करण्याचे काम केले आहे.
देखाव्याच्या संकल्पनेविषयी पद्माकर पाठकजी म्हणाले, ‘करोनाच्या काळात यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा होणार असल्याचे स्पष्ट झाले आणि मग आम्हीही दर वर्षी प्रमाणे विस्तृत मांडणी करताना सजावटीचे लहान रूप साकारायचे ठरवले. शेखर हसबनीस यांनी यासाठी आवश्यक चित्रे व ग्राफिक्स तयार केले. करोनाच्या संकटकाळात लढणारे डॉक्टर व आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, रस्त्यावर उतरून आपत्कालीन परिस्थितीत अहोरात्र काम करणारे पोलिस, शेजारील राष्ट्रांकडून सुरू असलेल्या कुरापती हाणून पाडत सीमांचे रक्षण करणारी सैन्यदले, रोजच्या जगण्यासाठी ऊर्जा मिळावी यासाठी कष्ट करणारा बळीराजा या सर्वांना ‘सलाम’ करण्यासाठी आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे गणेशाचे ‘विघ्नहर्ता’ रूप आम्ही साकारले.’ दर वर्षी महाराष्ट्रासह सातासमुद्रापार पोहोचणाऱ्या पाठकजी कुटुंबीयाच्या गणेशाचे दर्शन यंदा सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना घेता येणार असल्याचेही पद्माकर पाठकजी यांनी स्पष्ट केले.