
महात्मा जोतिराव फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त त्यांची कुलभूमी असलेल्या कटगुण (ता. खटाव) येथे १५ व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या संयोजन समितीने अभिवादन केले. तसेच साताऱ्यात ९ व १० मे रोजी होणाऱ्या संमेलनाची घोषणा केली.
स्थैर्य, सातारा, दि. ११ एप्रिल : महात्मा जोतिराव फुले यांचे आजपासून २०० वे जयंती वर्ष सुरू झाले आहे. या निमित्ताने त्यांची कुलभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यातील कटगुण येथे जाऊन १५ व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या संयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महात्मा फुलेंना अभिवादन केले आणि त्यांचा क्रांतिकारक वारसा पुढे नेण्याचा संकल्प केला.
पुतळ्याला पुष्पहार आणि आवाहन पत्रिकेचे अनावरण
कटगुण येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. सुहास महाराज फडतरे, कार्याध्यक्ष विजय मांडके, सरचिटणीस ॲड. राजेंद्र गलांडे, सहकार्याध्यक्ष मिनाज सय्यद, हनुमंत सावंत, शिवाजी भोसले, आसिफ शेख व प्रकाश तांबे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. याच पवित्र ठिकाणी आगामी १५ व्या विद्रोही संमेलनाच्या आवाहन पत्रिकेचेही मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
साताऱ्यात ९ व १० मे रोजी विद्रोही संमेलन
येत्या ९ व १० मे रोजी सातारा येथे १५ वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज कटगुण येथे जाऊन तेथील ग्रामस्थांना आणि नागरिकांना संमेलनासंदर्भात सविस्तर माहिती दिली. संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. सुहास महाराज फडतरे यांनी सर्वांना या संमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. यावेळी संमेलन समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेचे वाटप उपस्थितांना करण्यात आले.
वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन
महात्मा फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने संपूर्ण वर्षभर समविचारी कार्यकर्ते आणि संघटनांना बरोबर घेऊन विविध प्रबोधनात्मक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे समितीच्या वतीने यावेळी स्पष्ट करण्यात आले.

