दैनिक स्थैर्य । दि. १० जानेवारी २०२३ । कोळकी । फलटण तालुक्यातील विडणी या गावामधील एक शेतकरी आपली नियमित वाट बदलत पदवी प्राप्त केल्यानंतर नोकरीच्या मागे लागण्याऐवजी आपल्या शेतीमध्ये लक्ष देत आज लाखो रुपये कमवत आहे. हे उदाहरण फलटण तालुक्यासह राज्यातील युवकांना मार्गदर्शक असे ठरत आहे.
आपण आज माहिती घेणार आहोत; फलटण तालुक्यामधील विडणी या गावातील हेमंत बबनराव जाधव या शेतकऱ्याची…..
हेमंत जाधव हे फलटण तालुक्यामधील विडणी येथे आपला पारंपारिक शेती हा व्यवसाय करतात सुमारे वीस वर्षांपूर्वी त्यांनी मुधोजी महाविद्यालय येथून आपली पदवी प्राप्त केली. त्यानंतर इतर मुलांप्रमाणे नोकरीच्या किंवा इतर व्यवसायाच्या वाटेवरून न जाता त्यांनी आपली पारंपारिक असलेली शेती करण्याचा निर्णय घेतला व आज आधुनिक शेती करत एक आदर्श त्यांनी तालुक्यातील तरुण पोरांच्या पुढे उभा केलेला आहे.
हेमंत जाधव यांनी फलटण तालुक्यातील विडणी येथे असणाऱ्या आपल्या शेतीमध्ये सुमारे 15 वर्षांपूर्वी जरबेराची शेती करण्याची सुरुवात केली. त्यामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणावर यश प्राप्त झाले. त्यानंतर त्यांनी आता एप्पल बोर विकसित करून यामधून ते लाखो रुपये कमवत आहेत.
शेतीमधून पारंपारिक मार्ग न निवडता आधुनिक पद्धतीने शेती केली. तर आता सर्वसामान्य शेतकरी सुद्धा लखपती होऊ शकतो. याशी बरीचशी उदाहरणे आपण डोळ्यापुढे पाहत आहोत. त्यामधीलच एक उदाहरण म्हणजे हेमंत जाधव होय….
युवकांनी नोकरी धंद्याच्या मागे न पळता आपल्या घरची शेती जर नोकरीच्या वेळेप्रमाणे वेळ देत केली किंबहुना व्यवसायामध्ये जेवढा वेळ देतो तेवढा वेळ देत केली, तर नक्कीच त्याचा फायदा संपूर्ण कुटुंबाला होतो. हे हेमंत जाधव यांच्या उदाहरणांमधून दिसून येत आहे.