स्थैर्य, विडणी : विडणी गावामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने प्रत्येक वाडी वस्ती मध्ये कंटेंटमेंट झोन झालेले आहेत. विडणी मध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढू नये व कोरोनाची साखळी नव्याने तयार होऊ नये म्हणून विडणी गावातील ग्रामस्थांनी व ग्रामपंचायतीने संपूर्ण विडणी गाव कंटेंटमेंट झोन घोषित करून चौदा दिवस पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
बफर झोन मध्ये असणारे विडणी गावात कोरोना पेशंटची संख्या झपाट्याने वाढत आहे. शनिवार (दि. ५ सप्टेंबर) पासून विडणी गाव कंटेंटमेंट झोन घोषित केल्याने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व विडणी गाव बंद राहणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता पूर्ण गाव बंद ठेवण्याचा निर्णय विडणी ग्रामपंचायत, दक्षता कमिटी व ग्रामस्थांच्या पुढाकाराने घेण्यात आलेला आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून विडणी गावात निर्जतुंकीकरण फवारणी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात येत आहे. आशा व आरोग्य सेविका होम टू होम सर्वे करीत आहेत. विडणी गावामध्ये विनामास्क फिरताना आढळ्यास त्यास रुपये ५०० दंड ठोठावला जात आहे. व्यापाऱ्यांनी व ग्रामस्थांनी शासनाने दिलेल्या नियमांचे म्हणजेच सोशल डिस्टंसिंग व इतर नियमांचे पालन न केल्यास संबंधितावर गुन्हे दाखल केले जाणार आहेत, असेही विडणी ग्रामपंचायत व दक्षता कमिटी वतीने जाहीर करण्यात आलेले आहे.