योग अभ्यासाचा ऑनलाईन शिक्षण कार्यक्रमात समावेश करण्याचे उपराष्ट्रपतींचे शैक्षणिक संस्थाना आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


महामारीमुळे आपल्या जीवनात निर्माण झालेला अत्युच्च ताण कमी करण्यासाठी योग हा प्रभावी उपाय

स्थैर्य, नवी दिल्ली, 21 : कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या ऑनलाईन शिक्षण कार्यक्रमाचा एक भाग म्हणून त्यात योग अभ्यासाचा समावेश करण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी शिक्षण संस्थाना केले आहे. शरीराची रोगप्रतिकार क्षमता वाढवण्याचा हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे ते म्हणाले. 

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त स्पीक मॅके तर्फे आयोजित डिजिटल योग आणि ध्यानधारणा शिबिराचे उद्घाटन करताना ते बोलत होते. योग म्हणजे भारताने जगाला दिलेली आगळी भेटअसून योग अभ्यासामुळे जगभरात लाखो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडले असल्याचे उपराष्ट्रपतीनी सांगितले.

लहान वयातच मुलांना योगाभ्यासाची ओळख करून दिली पाहिजे. युनिसेफ कीड पॉवरने मुलांसाठी 13 योग आसने सुचवल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

5000 वर्षापासूनची प्राचीन योग परंपरा म्हणजे केवळ व्यायाम नव्हे तर संतुलन, मुद्रा, सौष्ठव, मनशांती आणि समन्वय यावर भर देणारे विज्ञान आहे. योग अभ्यासातल्या विविध मुद्रा, श्वासविषयक व्यायाम आणि ध्यानधारणा यांच्या समन्वयातून मानवी शरीर आणि मन यामध्ये अनेक मार्गांनी सकारात्मक परिवर्तन घडते असे ते म्हणाले.

संपूर्ण स्वास्थ्यासाठी योगाच्या अपार शक्यता आजमावण्यासाठी  मोठ्या प्रमाणात वैज्ञानिक प्रयोगांचे आवाहन त्यांनी केले. उपचार पद्धती किंवा योग चिकित्सा म्हणून योग अतिशय लोकप्रिय ठरल्याचे ते म्हणाले. अनेक रोगांवर उपचार म्हणून योगामध्ये क्षमताअसल्याचे मोठ्या प्रमाणात झालेल्या वैज्ञानिक अभ्यासातूनपुढे येत आहे.

कोविड-19 महामारीच्या लोकांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामाचा उल्लेख करत जग एका आव्हानात्मक परिस्थितीतून जात असल्याचे ते म्हणाले. यावर मात करण्यासाठी आपण एकत्रित लढा द्यायला हवा आणि त्याच बरोबर शारीरिक आणि मानसिक दृष्ट्याही निरोगी राहायला हवे.

ही महामारी म्हणजे केवळ आरोग्य समस्या नाही याकडे लक्ष वेधत त्यांनी जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या वाढत्या रोगांबाबत चिंता व्यक्त केली. भारतात 2016 मधे 63% मृत्यू हे असंसर्गजन्य रोगांमुळे झाल्याचे त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेचा दाखला देऊन सांगितले. जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या व्याधी टाळण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण राखण्यासाठी योग हे सुलभ आणि प्रभावी साधन असल्याचे त्यांनी सांगितले. 

आधुनिक जीवनातले ताण-तणाव झेलता येत नसल्याने युवक आपले जीवन संपवत असल्याच्या घटनाबद्दल चिंता व्यक्त करतानाच असे मृत्यू पूर्णपणे टाळता येतील. नैराश्य, चिंता आणि ताण यासारख्या समस्या हाताळण्यासाठी प्रभावी उपाय म्हणून योग उपयुक्त ठरू शकतो असे मत त्यांनी व्यक्त केले. आपला युवक शारीरिक, मानसिक आणि भावनात्मक दृष्ट्याही तंदुरुस्त  राहावा याची खातरजमा करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करायला हवेत.

योग व्यावसायिकांसाठी, स्वेच्छा प्रमाणपत्र योजना या सरकारच्या कार्यक्रमाची प्रशंसा करत यामुळे आणखी व्यावसायिक योग शिक्षकांना प्रमाणपत्र प्राप्त होऊन योगाचा प्रचार होण्यासाठी मदत होणार असल्याचे ते म्हणाले.

तंदुरुस्त राहण्यासाठीचे सर्वात मोठे अभियान म्हणून योग जगभरात मान्यता मिळवत असून ते पुढे नेण्याची जबाबदारी आपणा सर्वांवर असल्याचे ते म्हणाले. भारताची प्राचीन संस्कृती असलेल्या योगाला अखंडित परंपरा असून ही अमुल्य परंपरा कायम ठेवण्याची आपणा सर्वांची जबाबदारी आहे असे ते म्हणाले.

डिजिटल योग आणि ध्यानधारणा शिबिराची प्रशंसा करत अशी शिबिरे म्हणजे त्या दिशेने टाकलेले पाऊल असून युवा पिढीसाठी भविष्यात असे अनेक कार्यक्रम आयोजित होत राहतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!