मुधोजी महाविद्यालयास कुलगुरू डॉ. शिर्के यांची भेट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ११ डिसेंबर २०२४ | फलटण |
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर डॉ. डी. टी. शिर्के यांनी मुधोजी महाविद्यालयास ७ डिसेंबर रोजी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याशी संवाद साधला.

डॉ. शिर्के यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या काही विद्यापीठाशी संबंधित समस्या जाणून घेतल्या. यावेळी प्राध्यापकांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणविषयक काही मुद्द्यांची चर्चा केली. तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी शिक्षकेतर कर्मचारी भरतीबाबत विद्यापीठाने पाठपुरावा करावा, असे सूचविले.

शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांच्या अनुषंगाने कुलगुरूंनी आपले मनोगतव्यक्त करताना सर्व शंका-कुशंका दूर करून तात्काळ प्राचार्यांच्या मार्फत आपल्या काही सूचना विद्यापीठाकडे पाठवून द्याव्यात, असे सांगितले. ते पुढे बोलताना म्हणाले की, मुधोजी महाविद्यालयाने नॅकची ‘ए प्लस’ श्रेेणी मिळवली, त्याबद्दल आपले सर्वांचे अभिनंदन करण्याच्या हेतूनेच आजची ही महाविद्यालयास सदिच्छा भेट आहे. आपण अतिशय चांगल्या पद्धतीने काम केले व ही चांगली श्रेणी प्राप्त केली. आपण निश्चितच कौतुकास पात्र आहात. यापुढे आपण अन्य महाविद्यालयांनाही मार्गदर्शन करावे, असे सांगितले.

डॉ. शिर्के यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये महाविद्यालयातील प्राध्यापकांनी अभ्यास मंडळाच्या माध्यमातून उपयोजित अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने बदल घडवून आणावेत, असे आवाहन केले. त्याबरोबरच त्यांनी महाविद्यालयाच्या क्रीडा विभाग, कलाविष्कार विभागाच्या दैदीप्यमान कामगिरीबद्दल कौतुक केले.

कुलगुरूंनी विद्यार्थ्यांशी हितगुज करताना म्हटले की, विद्यार्थ्यांनी विविध व्यावसायिक कोर्सेसच्या माध्यमातून करिअर करत असताना प्रेझेंटेशनला जास्त महत्त्व द्यावे, कारण आपण जे ज्ञान अगर कौशल्य प्राप्त केलेले असते, त्याबाबतची माहिती आपण प्रेझेंट करण्यासाठी चांगल्या संवादकौशल्याची आवश्यकता असते. त्यावर आपण भर द्यावा. त्यासाठी ग्रुप डिस्कशन, ओरल एक्झाम या अतिशय महत्त्वाच्या घटकांबाबत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुढे आणा. हे विद्यार्थी पुणे-मुंबईच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेने यातच मागे पडतात, म्हणून आपण मुलाखतीची तयारी चांगल्या पद्धतीने केली पाहिजे.

प्रारंभी एनसीसीच्या कॅडेटने कुलगुरूंचे सलामी देऊन स्वागत केले. त्यावेळी त्यांच्यासोबत व्यवस्थापनाच्या वतीने फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे, ट्रेझरर हेमंत रानडे, गव्हर्निंग कौन्सिलचे मेंबर डॉ. राज वैद्य व प्रशासनाधिकारी प्राचार्य अरविंद निकम सर उपस्थित होते. यावेळी व्यवस्थापनाच्या वतीने डॉ. शिर्के यांचे स्वागत करण्यात आले.

प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांनी कुलगुरूंना प्राचार्य विश्वासराव देशमुख लिखित ‘मालोजीराजे’ हा ग्रंथ भेट दिला. यावेळी कदम यांनी प्रास्ताविकामध्ये महाविद्यालयाची माहिती दिली. महाविद्यालयाची विद्यार्थी संख्या महाविद्यालयाने मिळवलेले पुरस्कार व गत पाच वर्षांमध्ये केलेल्या कामगिरीचा आलेख त्यांनी यात मांडला.

महाविद्यालय गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. टी. पी. शिंदे यांनी आभार मानले.

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. शिर्के यांनी केलेल्या कौतुकामुळे महाविद्यालयाच्या गुणवत्तावाढीला आणखी गती प्राप्त होणार आहे. त्यामुळे ही भेट महाविद्यालयाच्या व फलटण एज्युकेशन सोसायटीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

कुलगुरूंनी आपल्या व्यस्त कामकाजातून मुधोजी महाविद्यालयास सदिच्छा भेट दिल्याबद्दल महाविद्यालयाचे प्रशासन व फलटण एज्युकेशन सोसायटी यांनी डॉ. शिर्के यांचे आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!