
दैनिक स्थैर्य । 19 एप्रिल 2025। सातारा । गेले 60 वर्षे पत्रकारिता व साहित्य क्षेत्रातील कार्य, पोंभुर्ले (जि. सिंधुदुर्ग) येथे आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मारक उभारणारे, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार, मसाप, पुणेचे जिल्हा प्रतिनिधी, साहित्यिक रवींद्र बेडकिहाळ यांच्या कार्याचा गौरव समारंभ साताऱ्यात आज, शनिवार दि.19 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजता जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
मावळा फौंडेशन आणि जिल्हयातील सर्व साहित्यिक आणि पत्रकारांतर्फे हा गौरव समारंभ होणार असल्याची माहिती सोहळ्याचे निमंत्रक अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, महाराष्ट्र शासनाच्या पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरिष पाटणे आणि रवींद्र बेडकिहाळ गौरव समितीच्यावतीने देण्यात आली.
यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, खा. नितीनकाका पाटील, अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह सुनिताराजे पवार, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
1968 पासून गेली 57 वर्षे श्री. बेडकिहाळ हे विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारांवरील आपद्ग्रप्रसंगात त्यांच्या, त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी त्वरित अर्थसाह्याचा हात देण्यासाठी त्यांनी दि. 6 जानेवारी 1987 रोजी सातारा येथूनच महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या स्वायत्त विश्वस्त संस्थेची स्थापना केली. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोकणात दुर्गम भागामध्ये त्यांनी सहकार्यांच्या अथक परिश्रमातून 1993 मध्ये बाळशास्त्रींच्या जन्म गावी पोंभुर्ले, ता. देवगड जि. सिंधुदुर्ग येथे राज्यातील पहिले स्मारक म्हणून ‘दर्पण’ सभागृह उभारले.
गेली 35 वर्षे तिथे विविध कार्यक्रमातून व राज्यातील गुणवंत पत्रकारांना ‘दर्पण पुरस्कार’ देऊन आजही बाळशास्त्रींची स्मृती जिवंत ठेवली आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या माध्यमातून आचार्य बाळशास्त्रीं जांभेकर कर्तृत्वाचा एक शोध हा बृहद् ग्रंथ तीन खंडांमध्ये 2200 पृष्ठांचा लवकरच प्रकाशित होण्याच्या वाटेवर आहे.