
स्थैर्य, फलटण, दि. ०७ सप्टेंबर : ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. इंदुमती मेहता यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित भव्य नागरी सत्कार समारंभात राजकीय, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील दिग्गज एकाच व्यासपीठावर अवतरले होते. जुन्या पिढीतील पत्रकारांचे नैतिक धैर्य आणि आजच्या पत्रकारितेची घसरलेली मूल्ये यावर ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले यांनी परखड भाष्य केले, तर फलटणमधील दोन राजकीय गटांमधील संघर्षातूनच तालुक्याचा विकास झाल्याचे स्पष्ट मत अरविंद मेहता यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर होते. यावेळी विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले, ह.भ.प. बंडातात्या कराडकर, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार महादेवराव जानकर, आमदार सचिन पाटील, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जुन्या पिढीतील पत्रकारितेला उजाळा – वसंत भोसले
ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले यांनी आपल्या भाषणात जुन्या आणि नव्या पत्रकारितेची तुलना केली. ते म्हणाले, “फलटणसारख्या शहरांमध्ये आपल्या भागाची पूर्ण माहिती असलेले आणि नेत्यांना काही सांगण्याचे नैतिक धैर्य असणारे पत्रकार पूर्वी होते. मात्र, अलीकडे राजकारण्यांप्रमाणे पत्रकारांवरील विश्वासही कमी होत असल्याची खंत आहे.” त्यांनी सांगितले की, “बातमी देण्यापेक्षा कोणती बातमी देऊ नये, याचा विचार करणारी अरविंद मेहता यांची पिढी शेवटची आहे. नव्या पिढीने समाजाच्या प्रश्नांची बांधीलकी स्वीकारून आणि सखोल अभ्यास करून पत्रकारिता करण्याची गरज आहे.”
संघर्षाला माणुसकीची जोड हवी – श्रीमंत रामराजे
अध्यक्षीय भाषणात आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटणच्या गट-तटाच्या राजकारणावर भाष्य केले. ते म्हणाले, “आमचा संघर्ष असला तरी तालुक्याचे नुकसान होऊ नये यासाठी कुठे थांबावे, हे आम्हाला माहीत आहे. संघर्षाला माणुसकीची जोड देऊन सर्वसामान्यांना काय देता येईल, यावर आमचा भर असतो.” त्यांनी अरविंद मेहता यांना समाजातील चुकांवर परखडपणे लिहिण्याचे आवाहन केले.
दोन निंबाळकरांना एकत्र आणणारे मेहता – रणजितसिंह नाईक निंबाळकर
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी, “अरविंद मेहता यांनी समाजहिताला प्राधान्य देत पत्रकारितेचा अंकुश योग्य पद्धतीने वापरला, त्यामुळे त्यांचा शब्द कोणीही डावलू शकले नाही,” असे गौरवोद्गार काढले. जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे यांनी, “जिल्ह्याच्या राजकारणातील दोन निंबाळकरांना एकत्र आणण्याची क्षमता केवळ अरविंद मेहता यांच्यातच आहे,” असे सांगितले.
सत्कारामागील भूमिका स्पष्ट – अरविंद मेहता
स्वतः अरविंद मेहता यांनी या सत्कारामागील भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “गेल्या ३० वर्षांत फलटणमध्ये दोन राजकीय गटांत सुरू असलेल्या अनोख्या संघर्षातून आणि विकासाच्या स्पर्धेतूनच तालुक्यात ४ साखर कारखाने उभे राहिले, रेल्वे आली आणि राष्ट्रीय महामार्ग गेले. हा विकासासाठीचा संघर्ष सुरू राहावा आणि सर्वांना एकत्र आणून लोकांच्या अपेक्षा मांडाव्यात, यासाठी माझ्या अमृत महोत्सवाचे केवळ निमित्त केले आहे.”
या कार्यक्रमात ‘आठवणींचा अमृतसंग्रह’ या गौरव अंकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील १२ ज्येष्ठ पत्रकारांचा प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान करण्यात आला. यामध्ये रविंद्र बेडकीहाळ, शामराव अहिवळे, सौ. विमल नलावडे, नारायण शिंगटे, दत्ता मर्ढेकर, शिवरतन पल्लोड, बापूराव गुंजवटे, संपत देसाई, पां. प. पवार, शंकर पाटील, शशिकांत जाधव आणि विनय भिसे यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सतीश जंगम व आनंद पवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन युवराज पवार यांनी केले.