
स्थैर्य, कोल्हापूर, दि.२४: मराठी चित्रपटसृष्टीतून आणखी एक दुःखद बातमी आली आहे. 22 सप्टेंबर रोजी ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावर यांच्या निधनानंतर दुस-याच दिवशी सरोज सुखटणकर यांचे निधन झाले. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. त्या 84 वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर त्यांचे मुळ गाव असलेल्या रुई (ता. हातकणगंले) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या अविवाहित होत्या.
छोट्या पडद्यावर सध्या सुरु असलेल्या ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत त्या अखेरच्या झळकल्या होत्या. रुईमधील न्यू भारत नाट्य क्लबच्या माध्यमातून त्यांना नाटकांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर त्यांनी व्यावसायिक नाटकांमध्ये विविध भूमिका साकारल्या. 50 हून अधिक नाटकांमध्ये त्यांनी विविध भूमिका पार पाडल्या. ‘नर्तकी’ या त्यांच्या गाजलेल्या नाटकाचे 300 हून अधिक प्रयोग झाले होते. ‘वादळवेल’ या नाटकातील त्यांची भूमिका विशेष गाजली होती.
80 हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी काम काम केले होते. ‘एकटा जीव सदाशिव’, ‘जोतिबाचा नवस’, ‘दे दणादण’, ‘लेक चालली सासरला’ अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. अलका कुबल यांच्या समवेत त्यांनी ‘धनगरवाडा’ हा शेवटचा चित्रपट केला होता. त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीनेही त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्या कोल्हापुरात स्थायिक झाल्या होत्या.