दैनिक स्थैर्य । दि. १२ जुलै २०२२ । मुंबई । बौद्धजन सहकारी संघाचे माजी मुख्य विश्वस्त त्याचप्रमाणे बौद्धजन सहकारी संघ शाखा क्र. ३२ मुक्काम गाव मळण, ता. गुहागर, जिल्हा रत्नागिरी या गावचे सुपुत्र तसेच आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते व्ही. व्ही. जाधव यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
“दादा”, “मास्तर” या टोपणनावाने लोकप्रिय असलेले व्ही. व्ही. जाधव म्हणजे चळवळीतील कणखर, आदर्श व वैचारिक वारसा असलेले व्यक्तिमत्व, ते प्रेमळ, मनमिळावू व सर्वसमावेशक स्वभावाचे म्हणून प्रसिद्ध होते, त्यासोबत तालुक्यातील पहिले पदवीधर विद्यार्थी म्हणूनही त्यांना नावलौकिक मिळाला होता.
बौद्धजन सहकारी संघाच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता, नवोदित कार्यकर्त्यांना मार्गदर्शक म्हणून त्यांनी मोलाची मदत केली तसेच संघ हा गतिमान आणि गतिशील व्हावा म्हणून ते नेहमीच कार्यतत्पर असत व त्याच अनुषंगाने कार्यकर्त्यांना सूचना देऊन त्यांच्याकडून योग्य अशा कार्याची पूर्तता करून घेत. अशा प्रकारचे बौद्धजन सहकारी संघाचे आदर्श व्यक्तिमत्त्व हरपल्याने समाजामध्ये एक पोकळी निर्माण झाली असे मत समाजातील सर्व स्तरातील लोकांद्वारे व्यक्त केले जात आहे.
व्ही व्ही जाधव यांच्या अंत्ययात्रेत सामाजिक राजकीय व समाजातील सर्व स्तरातील व्यक्ती उपस्थित होत्या एक आदर्श व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेल्याने सर्वजण हळहळ व्यक्त करत होते, त्यांच्या दुःखद निधनाची बातमी कळताच बौद्धजन सहकारी संघ मध्यवर्ती कमिटी विश्वस्त मंडळ आणि विभाग अधिकारी मुंबई आणि गाव शाखेच्या वतीने त्यांच्याबद्दल दुःखद ठराव व्यक्त करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून संघ यापुढेही आपली वाटचाल सुरू ठेवेल असे विचार तालुका चिटणीस संजय तांबे यांनी आपल्या परिपत्रकात म्हटले आहे.