दैनिक स्थैर्य । दि. १९ ऑगस्ट २०२२ । फलटण । समाजातील लोकांचा होणारा सत्कार हा गौरव सन्मान असतो तर धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या गुरुवर्य यांचा सत्कार म्हणजे परमार्थ पूजन होय असे गौरवोद्गार ज्येष्ठ भागवताचार्य व व्यसनमुक्त संघाचे युवक मित्र ह भ प बंडातात्या कराडकर यांनी काढले.
फलटण तालुका वारकरी संघटनेच्या वतीने सुरू असलेल्या द्विमासिक संकल्पित त्रैवार्षिक राज्यस्तरीय धार्मिक महोत्सवामध्ये वाई लिंगायत मठसंस्थांचे अधिपती श्री ष. ब्र. १०८ सद्गुरु महादेव शिवाचार्य महाराज यांच्या सप्त धान्य तुला व सन्मान प्रसंगी ह भ प कराडकर बोलत होते. यावेळी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषद सदस्य ऍड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर, वारकरी संघटनेचे अध्यक्ष ह भ प छगन महाराज निंबाळकर, सचिव ह भ प केशव महाराज जाधव, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता व रवींद्र बेडकीहाळ वारकरी संघटनेचे माजी अध्यक्ष बबनराव निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्रीमद् भागवत कथा पुराण सांगताना ह भ प बंडातात्या कराडकर यांनी सांगितले की भागवत कथा ही जीवन जगण्याचा मार्ग दाखवते जीवनात येणाऱ्या अडचणी कशा पद्धतीने सोडवता येतील याबाबत मार्गदर्शन करते अशा ग्रंथांबरोबरच आपल्या जीवनात असणारे आपले मार्गदर्शक गुरुवर्य यांचेही मार्गदर्शन अनमोल असल्याचे सांगितले.
सद्गुरु महादेव शिवाचार्य महाराज यांनी वैष्णव आणि शैव हे दोन्हीही पंथ सारखेच गरजेचे असल्याचे सांगत जसे उभे आणि आडवे धागे विणल्याशिवाय कापड तयार होत नाही तसे समाजामध्ये वैष्णव आणि शैव हे दोन्हीही पंथ सारखेच महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
यावेळी सद्गुरु महादेव शिवाचार्य महाराज यांचे वीरशैव लिंगायत समाज फलटण यांच्यावतीने फलटण तालुका वारकरी संघटनेच्या धार्मिक महोत्सवात सप्तधान्यतूला करण्यात आली व हभप बंडातात्या कराडकर यांच्या हस्ते परमार्थ जीवनगौरव सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
सन्मान पत्राचे वाचन प्रा. सतीश जंगम यांनी केले. यावेळी वारकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी, सदस्य लिंगायत समाज व वारकरी संप्रदायातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.