स्थैर्य, सातारा , दि. २४: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा शहरातील सर्व भाजीमंडई आणि रस्ते शनिवारपासून बंद करण्यात आले आहेत. सध्या संचारबंदीची योग्य अंमलबजावणी होत असूनही दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने नियम आणखी आवळण्याचा निर्णय पोलीस प्रशासना आणि सातारा नगरपालिकेकडून घेण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातार्यात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आली होती. नागरिकांच्या सोयीसाठी सकाळी 7 ते 11 या वेळेत दुकाने उघडी ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, या वेळेत नागरिक भाजी मंडईत मोठ्या प्रमाणावर गर्दी करताना निदर्शास आले होते. त्याचप्रमाणे व्यापारीही जिल्हाधिकार्यांचे आदेश धाब्यावर बसवून दुकाने अर्धवट उघडी ठेवून व्यवसाय करत असल्याचे आढळून आले. तसेच काही किराणा दुकानदारांनीही नेमून दिलेल्या वेळेव्यतिरिक्त दुकाने उघडी ठेवल्याचे आढळल्याने पोलिसांना गुन्हे दाखल करावे लागले आहेत.
प्रशासनाकडून वारंवार सूचना करूनही रोज सकाळच्या वेळेत नागरिक मोठ्या प्रमाणात भाजी खरेदी करण्यासाठी गर्दी करू लागले. अखेर सातारा पोलिस आणि सातारा नगरपालिकेकडून शनिवारपासून भाजी मंडई बंद करण्यात आली आहे. तसेच शहरातील रस्तेही बंद करण्यात आले आहेत. यामुळे पूर्वीच्या लॉकडाऊनप्रमाणे भाजी विक्री घरपोच होणार असून नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अन्यथा कारवाईस सामोरे जावे लागेल, असा इशारा पोलिस विभागाकडून देण्यात आला आहे.