वीर जवान मनोज माळी यांच्यावर शासकीय इतमामात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ११ जुलै २०२३ । धुळे । ‘अमर रहे…, अमर रहे… वीर जवान मनोज माळी अमर रहे…’च्या घोषात आज सकाळी वाघाडी, ता. शिरपूर येथे वीर जवान मनोज माळी यांना हजारो नागरिकांनी साश्रूपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप दिला.

भारतीय सैन्य दलात सिक्कीम येथे कार्यरत लान्सनायक मनोज माळी यांना ६ जुलै, २०२३ रोजी सिक्कीम येथे उंच डोंगराळ प्रदेशात कर्तव्य बजावत असतांना त्यांचा अचानक पाय घसरुन थेट ५०० ते ६०० फुट खोल दरीत कोसळून जखमी होऊन वीरमरण प्राप्त झाले. त्यांचे पार्थिव आज सकाळी वाघाडी, ता. शिरपूर येथे आणण्यात आले. त्यानंतर सजविलेल्या वाहनातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यानिमित्त ग्रामस्थांनी अंगणात रांगोळ्या रेखाटल्या होत्या. शालेय विद्यार्थी हातात तिरंगा घेवून ‘अमर रहे…, अमर रहे….. वीर जवान मनोज माळी अमर रहे’सह भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणा देत होते.

वीर जवान मनोज माळी यांचे पार्थिव अंत्यसंस्काराच्या ठिकाणी आल्यानंतर आमदार काशिराम पावरा, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा मेजर डॉ. निलेश पाटील, तहसीलदार महेंद्र माळी, भूपेशभाई पटेल, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ तुषार रंधे, सैनिक कल्याण संघटक रामदास पाटील यांचेसह मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. पोलिस दल आणि सैन्य दलाच्या तुकडीने हवेत गोळीबाराच्या तीन फैरी झाडत मानवंदना दिली. माजी सैनिकांनीही वीर जवानास अभिवादन केले.

वीर जवान माळी यांच्या भावाने मुखाग्नी दिला. आमदार श्री. पावरा व इतरांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी वीर जवान माळी यांचे कुटुंबीय, सैन्य दलाचे अधिकारी, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, नातेवाईक, आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!