स्थैर्य, शिरवडे, दि.२: शहापूर येथील जवान कृष्णात दिलीप कांबळे (वय 34) यांचे कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. श्री. कांबळे भारतीय सेनेत मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर येथे आर्मी सर्व्हिस कोअर येथे सेवा बजावत होते. सेवा बजावत असतानाच कांबळे यांना हृदयविकाराचा धक्का बसला. त्याचवेळी त्यांचे निधन झाले, अशी माहिती त्यांचे पार्थिव घेवून येणारे सैनिक कल्याण बोर्डाचे अधिकारी चंद्रकांत फाटक यांनी ग्रामस्थांना दिली.
जवान कांबळे यांच्या निधनाची बातमी काल रात्री शहापूरात समजली अन् गावावर शोककळा पसरली. श्री. कांबळे यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. शहीद कांबळे यांनी सेवाकाळ पूर्ण केला. मात्र, त्यांना सैन्य दलाकडून दोन वर्षांचा कालावधी वाढवून देण्यात आला होता. त्यांच्या पश्चात आई-वडील, बहीण, पत्नी व आठ वर्षीय कन्या असा परिवार आहे. कृष्णात कांबळे यांचे पार्थिव शुक्रवारी सकाळी शहापुरात आणण्यात आले. तेथे काहीकाळ पार्थिव अत्यंदर्शनसाठी ठेवण्यात आले. पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह विविध संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. त्यानंतर गावातून त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. कृष्णात कांबळे अमर रहे, अशा घोषणा उपस्थितांनी दिल्या. मुख्य गावातून अंत्ययात्रा निघाली. त्यावेळी बंदोबस्त होता. त्यानंतर शहापूर येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अवघे जग नववर्षाचे स्वागत करण्यात व्यस्त असताना कृष्णात कांबळे यांच्या निधनाची बातमी कळताच शहापूर गावावर मात्र दुःखाची अवकळा पसरली.
आठ वर्षांची मुलगी अनभिज्ञ
कृष्णात कांबळे यांची आठ वर्षीची कन्या सर्व काही पहात होती. मात्र, त्या निरागस जीवाला काहीच कळेना की आपली आई, आजी का रडत आहेत? तिची मनस्थिती पाहून उपस्थित नातेवाइकांना व ग्रामस्थांना आपले अश्रू अनावर झाले होते.