दैनिक स्थैर्य | दि. ४ जून २०२३ | फलटण |
महाराष्ट्रात सण, व्रतवैकल्यांना फार महत्त्व आहे. जेष्ठ महिन्यातील पौर्णिमेला म्हणजेच ‘वटपौर्णिमेला’ एक आगळेवेगळे महत्त्व आहे. आरडगावच्या मध्यवर्ती असणार्या हनुमान मंदिराच्या समोर भले मोठे एक वडाचे झाड आहे. याच वडाची पूजा गावातील असंख्य सुवासिनी महिलांनी करून ‘जन्मोजन्मी हाच पती मिळावा, आमचा सुखाचा संसार व्हावा’, यासाठी वडाची पूजा करून परमेश्वरास साकडे घातले.
वटपोर्णिमा म्हणजे ‘वटसावित्रीचे व्रत’. या दिवशी विवाहित महिला साजशृंगार करून वटवृक्षाची पूजा करतात. आपल्या देशात झाडांची पूजा करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाच्या पूजेला विशेष असे महत्त्व आहे. धार्मिक कथेनुसार सावित्रीने आपल्या पतीला परत आणण्यासाठी वटवृक्षाखाली बसून कठोर तपश्चर्या केली. त्यानंतर यमराज प्रसन्न झाले आणि तिला पुन्हा सत्यवान मिळाला. या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत करतात. तसेच झाडाभोवती कच्चा धागा गुंडाळून तीन परिक्रमा करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे यासाठी मनोभावे प्रार्थना करून वडाची पूजा करतात. वडाच्या वृक्षाचे आयुष्य जास्त असते. त्याच्या पारंब्याचा विस्तारही खूप मोठा होतो. त्याचप्रमाणे नैसर्गिकतः दिर्घायुष्य लाभलेल्या वडाच्या वृक्षाप्रमाणे आपल्या पतीला आणि कुंटुंबियांना आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभावे, हा त्यामागचा हेतू आहे.